नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेच्या १३५०० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) प्राप्तिकर विभागाने दणका दिला आहे. मेहुल चोक्सी फरार असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता प्राप्तिकर विभागाने मेहुल चोक्सीच्या मालकीची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमधील १०० एकर जमीन प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. या जमीनीची किंमत जवळपास ७० कोटींच्या घरात आहे.
बेनामी मालमत्ता व्यवहार कायद्याअंतर्गत मेहुल चोक्सीची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे. चोक्सी याच्या गितांजली जेम्स या कंपनीतून एका कंपनीत पैसे हस्तांतर करण्यात आले होते. या कंपनीच्या माध्यमातून ही जमीन खरेदी करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासात आढळून आले आहे.
बोगस कंपनी तयार करण्यात आली
नाशिक मल्टीसर्व्हिस सेझ लिमिटेड या नावाने बोगस कंपनी तयार करण्यात आली होती. यातून इगतपुरी तालुक्यातील मुंढे या गावी जवळपास ५० जमिनी खरेदी करण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या जमिनींवर २०२० मध्ये प्राप्तिकर विभागाने टाच आणली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये जमीनी ताब्यात घेण्यास संबधित यंत्रणेने प्राप्तिकर विभागाला परवानगी दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, डोमिनिका येथील उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, मी उपचारांसाठी भारत सोडला. जेव्हा भारत सोडला, तेव्हा त्याच्याविरोधात देश न सोडण्यासंदर्भात कोणतेही वॉरंट जारी करण्यात आलेले नव्हते. कायद्याचे पालन करणारा व्यक्ती आहे. तसेच माझ्यावरील आरोपांवर माझी कोणतीही मुद्द्यावर चौकशी करावी. मी भारताच्या तपास संस्थांपासून पळून आलेलो नाही, असा दावा मेहुल चोक्सीने केला होता.