Join us

शाही सोहळे, हॉटेलिंगवर आयकरचा ‘डोळा’; उत्पन्न अन् खर्चात मेळ नसल्यास नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 5:34 AM

आयकराच्या माध्यमातून कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली.

मुंबई : सरत्या आर्थिक वर्षात ज्या लोकांनी महागड्या लक्झरी ब्रँडची खरेदी केली आहे किंवा पंचतारांकित हॉटेल्स, प्रवास किंवा आलिशान लग्नसोहळे केले आहेत, अशा लोकांकडे आयकर विभागाने आपला मोर्चा वळविला असून संबंधित लोकांचे उत्पन्न आणि खर्च यांमध्ये जर मेळ आढळून आला नाही तर त्यांना नोटिसा पाठवत त्यांची चौकशी सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. 

आयकराच्या माध्यमातून कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून आयकरदात्यांच्या विविध मोठ्या रकमांच्या व्यवहारांकडे लक्ष दिले आहे. ज्या लोकांनी दोन लाख रुपयांच्या वर रोखीने व्यवहार केला आहे, त्यांनी आपले आयकर विवरण भरतेवेळी एसएफटी- ०१३ हा फॉर्म भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर अशा लोकांनी या फॉर्मच्या माध्यमातून आपल्या खर्चाचे तपशील सादर केले नाहीत तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

तसेच, ज्या लोकांनी लक्झरी उत्पादनांची खरेदी केली असेल आणि ती जर संबंधित व्यक्तींच्या उत्पन्नाशी मेळ खात नसेल तर अशा व्यवहारांचीदेखील चौकशी करण्याचे संकेत विभागाने दिले आहेत. महागड्या ब्रँडेड उत्पादनांची खरेदी करतेवेळी संबंधित दुकानांतर्फे पॅन कार्डाची मागणी केली जाते. तसेच ज्या लग्नांमध्ये पाच लाख रुपयांच्या वर खर्च केला आहे, अशा ठिकाणी संबंधित हॉलकडूनही आयोजकाच्या पॅन कार्डाची मागणी केली जाते. 

अधिक खर्च केल्यानंतर आयकर खात्यातर्फे चौकशी केली जाऊ शकते, याचा अंदाज असल्याने अनेक करदाते खर्चासाठी आपल्यासोबत नातेवाइकाचे किंवा मित्राचे अतिरिक्त पॅनकार्ड देऊन खर्चाची विभागणी करतात. ही कार्यपद्धती विभागाच्या लक्षात आली असून, त्यादृष्टीनेही चौकशी करण्याचे संकेत आयकर विभागाने दिले आहेत.

टॅग्स :कर