Join us

दिवाळीच्या बोनसवरही द्यावा लागतो प्राप्तिकर! जाणून घ्या कायद्यातील तरतुदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 6:07 AM

कंपनीकडून मिळणारे ५ हजार रुपयांपेक्षा जास्तीचे गिफ्ट व्हाऊचर कर्मचाऱ्याच्या वेतनाचा भाग म्हणून गृहीत धरले जाते. त्यावर कर्मचाऱ्याला लागू असलेल्या प्राप्तिकर स्लॅबनुसार कर लागतो.

नवी दिल्ली : दिवाळीमध्ये कंपनीकडून मिळणारा बोनस पूर्णत: करमुक्त नसून, कुठल्या स्वरूपात तो मिळतो, यावर प्राप्तिकर लागेल की नाही, हे अवलंबून आहे. कंपनीकडून मिळणारे ५ हजार रुपयांपेक्षा जास्तीचे गिफ्ट व्हाऊचर कर्मचाऱ्याच्या वेतनाचा भाग म्हणून गृहीत धरले जाते. त्यावर कर्मचाऱ्याला लागू असलेल्या प्राप्तिकर स्लॅबनुसार कर लागतो. कंपनीकडून थेट कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होणारी कोणतीही रक्कम वेतन म्हणून गृहित धरली जाते व तिच्यावर कर लागतो. कर्मचाऱ्याला रोख स्वरूपात मिळणारी रक्कम प्राप्तिकर विवरणपत्रात दाखवायला हवी. त्यामुळे तुम्हाला योग्य कर लावला जाऊ शकेल. या विषयीचे नियम बरेचसे क्लिष्ट आहेत. उदा. दिवाळीत एखाद्या कंपनीने ४ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो करपात्र असेल. त्यामुळे ही रक्कम ५ हजारांपेक्षा कमी असली, तरी करपात्र ठरते. कंपनीला त्यावर टीडीएस कापावा लागेल. पण कंपनीने रक्कम ‘सॅलरी हेड’मध्ये गिफ्ट म्हणून दाखविली, तर त्यावर कर लागणार नाही. त्यामुळे टीडीएसही कापला जाणार नाही. पाच हजार रुपयांपर्यंत करमुक्त एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्यांना ४,९९९ रुपयांचा बोनस टोकन अथवा व्हाऊचरच्या स्वरूपात दिला असेल, तर तो करमुक्त असेल. कारण तो ५,००० रुपयांपेक्षा कमी आहे. पण कंपनीने ५००१ रुपयांचे व्हाऊचर दिले, तर मात्र ही रक्कम करपात्र ठरेल.  येथे एक गोष्ट नोंदविणे आवश्यक आहे की, ५,००० रुपयांची कमाल मर्यादा ही संपूर्ण वर्षासाठी आहे. या वर्षातील सर्व गिफ्ट आणि बोनसाचे मूल्य ५,००० रुपयांच्या खाली असले, तरच ते करमुक्त राहील.