Join us

Income Tax: देशातील तीन बड्या उद्योगसमूहांवर Income Tax ची धाड; कॉर्पोरेट विश्वात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 1:40 PM

विशेष म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसांत आयकर विभागाने 3 बड्या उद्योग समुहांवर धाडी टाकल्या आहेत. 

नवी दिल्ली - केंद्रीय तपास यंत्रणांनी कार्पोरेट कंपन्यांवर लक्ष केंद्रीत केलं असून बिल्डर लॉबीवरही धाडी मारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, कार्पोरेट क्षेत्रासह बड्या शहरांतील बांधकाम व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे. ईडीने मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हुण्याच्या कंपनीवर धाड टाकून 11 फ्लॅट जप्त केले आहेत. तर, दुसरीकडे प्राप्तीकर विभागाने आज सकाळी हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. विशेष म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसांत आयकर विभागाने 3 बड्या उद्योग समुहांवर धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये, हिरानंदानी ग्रुप्स, ओमॅक्स आणि हिरो मोटोकॉर्पचा समावेश आहे.

मुंबईतील राजकारण्यांशी संबंधीत लोकांवर छापे टाकल्यानंतर आयकर विभागाने आता राज्यातील बड्या रिअल इस्टेट कंपनीवर छापे टाकले आहेत. यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने हिरानंदानी ग्रुपच्या विविध ठिकाणांवर आज छापेमारी केली आहे. करचोरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमधील २४ ठिकाण्यांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.

रियल इस्टेटमधील ओमॅक्स ग्रुपवर धाड 

रियल इस्टेंट क्षेत्रातील नामवंत ओमॅक्स ग्रुपने ग्राहकांशी 3000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक व्यवहार रोखीने केला आहे. विशेष म्हणजे हा व्यवहार बेहिशोबी असल्याचे सांगत प्राप्तीकर विभागाने पुरावेही गोळा केल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने उत्तर भारतात सक्रिय असलेल्या अग्रगण्य रिअल इस्टेट समूहाच्या आवारात 14 मार्च रोजी छापा टाकल्याचे निवेदन जारी केले. या धाडीत दिल्ली आणि एनसीआर, चंडीगड, लुधियाना, लखनौ आणि इंदौरमधील 45 हून अधिक भागांत छापा टाकण्यात आल्याचेही निवदेनात सांगितले आहे. 

हिरो मोटोकॉर्प ग्रुपवरही आयटीची कारवाई

प्राप्तिकर विभागाने आज सकाळी हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांच्या निवासस्थानांवर आणि गुडगांवमधील ऑफिसमध्ये सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. मुंजाल यांनी त्यांच्या खात्यांमध्ये खोटे खर्च दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. प्राप्तिकर विभागाने त्यासंदर्भातच सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे. या पथकाला जे संशयास्पद खर्च सापडले आहेत, त्यातील काही खर्च इनहाऊस कंपन्यांचेही आहेत. दरम्यान, ही छापेमारी पुढेही सुरू राहणार आहे.

दरम्यान, ईडी आणि आयटी विभागाकडून देशात मोठ्या प्रमाणात धाडसत्र सुरू असून आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित व्यक्ती आणि संस्थावर कारवाई करण्यात येत आहे. या संस्थांनी आता बिल्डर ग्रुपकडे नजर रोखल्याने कार्पोरेट क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.  

हिरानंदानी ग्रुपची 4 दशकपूर्ती

हिरानंदानी डेव्हलपर्सची स्थापना 1978 मध्ये निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी या दोन भावांनी केली. गेल्या चार दशकांमध्ये या ग्रुपने प्रामुख्याने महाराष्ट्रात अनेक प्रकल्प उभारले आहेत. आता निरंजन आणि सुरेंद्र हिरानंदानी हे स्वतंत्र रिअल इस्टेट कंपन्या चालवत आहेत. निरंजन हिरानंदानी हे हिरानंदानी कम्युनिटीजचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, तर सुरेंद्र हिरानंदानी हाऊस ऑफ हिरानंदानीचे अध्यक्ष आणि संचालक आहेत. 

टॅग्स :इन्कम टॅक्सअंमलबजावणी संचालनालयहिरो मोटो कॉर्पपैसा