नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या प्रचंड मोठ्या पराभवानंतर अर्थमंत्री अरुण जेटली कराचा स्लॅब वाढवतील किंवा बचतीवरील गुंतवणुकीची मर्यादा वाढवतील, असा अंदाज आहे. येत्या २८ फेब्रुवारी रोजी जेटली या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील.वैयक्तिक करदात्यांना दिलासा देण्याशिवाय जेटली कंपन्यांकडून गुंतवणुकीला आणि मेक इन इंडिया धोरणानुसार उत्पादनाला प्रोत्साहन देतील. या प्रोत्साहनामुळे भारत जागतिक पातळीवर उत्पादनाचे केंद्र बनेल व रोजगार निर्मितीही होईल, असा उद्देश आहे. जुलै २०१४ मध्ये जेटली यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता त्यात वैयक्तिक करदात्यांना दिलासा देण्याच्या धोरणाचे संकेत दिले होते व तेच यंदाही राबविले जाईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी जेटली यांनी वैयक्तिक करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५० हजारांनी वाढवून अडीच लाख रुपये केली होती. तसेच दीड लाख रुपयांची बचत हीदेखील आयकरातून मुक्त केली होती. मात्र यावेळी जेटली वरीलपैकी कोणताही एक पर्याय निवडतील, कारण त्यांना सार्वजनिक कामांसाठी जास्त पैसा खर्च करायचा असून वाढीव वृद्धीसाठी अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे, असे तज्ज्ञांना वाटते. आरोग्य विम्याच्या क्षेत्रात करमुक्त गुंतवणुकीची मर्यादाही जेटली वाढवू शकतात. या महिन्यात झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ७० पैकी केवळ तीन जागा जिंकल्या.
अर्थसंकल्पात आयकर सवलत वाढणार ?
By admin | Published: February 22, 2015 11:56 PM