इन्कम टॅक्स रिटर्नसाठी आता अखेरचे काही दिवस उरले आहेत. ज्या लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला आहे, त्यांच्या खात्यात आता रिफंडचे पैसे येऊ लागलेत. विभागाकडून टॅक्स रिटर्न पाठवण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आलीये आणि जर तुम्ही तुमचा आयटीआर दाखल केला नसेल, तर हे महत्त्वाचे काम करण्यासाठी केवळ १० दिवस उरले आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. तर दुसरीकडे ही तारीख आता पुढे वाढवण्याची शक्यता कमी आहे.
आयकर विभागाकडून करदात्यांच्या खात्यात आयकर रिटर्न जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ज्यांनी आयटीआर भरला आहे त्यांना रिफंडचे पैसे मिळू लागले आहेत. तर दुसरीकडे अखेरच्या तारखेपर्यंत वाट न पाहता लवकरात लवकर आयटीआर भरण्याचं आवाहनही आयकर विभागाकडून करण्यात येतंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयकर रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
३ कोटींपेक्षा अधिक आयटीआर दाखलआयकर विभागाच्या ट्विटर हँडलवर एका ट्विटद्वारे आतापर्यंत ३ कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आल्याची माहिती शेअर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयकर विभागानं हा टप्पा ७ दिवस आधीच गाठला आहे. ट्विटमध्ये असंही सांगण्यात आलंय की या वर्षी असेसमेंट इयर २०२३-२४ साठी, १८ जुलै २०२३ पर्यंत ३ कोटी पेक्षा अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. तर गेल्या वर्षी २५ जुलैपर्यंत तेवढेच आयटीआर दाखल करण्यात आले होते.
नंतर किती दंड?आयकर विभागाने ठरवून दिलेली अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत करदात्याला आयटीआर भरता आला नाही, तर नंतर त्याला दंडासह हे काम करावं लागेल. याअंतर्गत ५ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना १००० रुपये दंड, तर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नासाठी ५००० रुपये विलंब शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.