नवी दिल्ली-
इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याच्या मुदतीत आता १५ मार्च २०२२ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, ही मुदतवाढ सामान्य करदात्यांसाठी नसून बिझनेस क्लास आणि ऑडिटसाठी देण्यात आली आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठीची वाढीव मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत होती. यात वाढ केली जाणार नसल्याचं याआधी आयकर विभागाकडून जारी करण्यात आलं होतं. पण कोरोनामुळे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच संकेतस्थळातील काही त्रुटींमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी वाढीव मुदत देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) केवळ व्यापारी वर्गासाठी ही मुदत वाढवली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ऑडिट रिपोर्टच्या ई-फायलिंगमध्ये काही करदात्यांना अडचणी आल्या. त्याची दखल घेऊन ऑडिट रिपोर्ट आणि आयटीआर फाईल करण्याची मुदत १५ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.