अर्जुन : कृष्णा, सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी नवीन प्राप्तिकर विवरण जाहीर केले आहे.
कृष्ण : अर्जुना, दरवर्षी आयटीआर फॉर्म एप्रिल महिन्यातच जाहीर केले जातात. मात्र, कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदाचा आयटीआर फॉर्म २९ मे रोजी जाहीर करण्यात आला. यात उच्च किमतीच्या व्यवहारांचे अहवाल देण्यास सांगितले आहे.
अर्जुन : कृष्णा, यामध्ये कोणते व्यवहार समाविष्ट केले आहेत? तसेच कोणत्या कारदात्यास ते लागू
आहे ?
कृष्ण : अर्जुना, कलम १३८ (१) च्या सातव्या तरतुदीनुसार ज्या व्यक्तीचे उत्पन्न बेसिक एक्झम्शन ओलांडत नसेल तर त्यास प्राप्तिकर विवरणपत्र भरणे आवश्यक नाही. मात्र, अशा व्यक्तीने खालीलपैकी कोणतेही व्यवहार केल्यास त्यास विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.
१) एक किंवा अधिक चालू खाते अथवा बँकेत १ कोटींपेक्षा जास्त ठेवी असणे. एक वर्षात एक अथवा त्याहून अधिक चालू खात्यात रोख रक्कम, धनादेश अथवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवी ठेवल्या असल्यास
२) स्वत:साठी अथवा कोणत्याही व्यक्तीसाठी परदेशात जाण्यासाठी दोन लाखांपेक्षा अधिक खर्च. भारतीय रुपयात अथवा परदेशी चलनात रोख, धनादेश, फॉरेक्स कॉर्ड अथवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये तो केलेला असो.
३) निवासी अथवा व्यावसायिक वीज बिलावर एक लाखापेक्षा अधिक खर्च. या सर्व खर्चासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.
अर्जुन : कृष्णा, वरील तरतुदी नुसार प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी कोणता फॉर्म वापरायला हवा?
कृष्ण : चालू खात्यातील ठेव रक्कम, परदेशी प्रवासात केलेला खर्च, वीजबिलासाठी भरलेली रक्कम सादर करणे आवश्यक आहे. हा तपशील आयटीआर १,२,३ आणि ४ मध्ये भरणे आवश्यक आहे.
अर्जुन : यामधून करदात्यानी काय बोध घ्यावा ?
कृष्ण : अर्जुना, आता करदात्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्यांनी उच्च किमतीचे व्यवहार केले आहेत, त्यांनी विवरणपत्र भरलेच पाहिजे, असे प्राप्तिकर विभागाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी करदात्यांनी उच्च व्यवहारांची मर्यादा ओलांडली की नाही हे तपासावे. जर ही मर्यादा ओलांडली असल्यास त्यांनी विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. बेसिक एक्झम्शन लिमिट ओलांडली नसल्यासही त्यांना त्याबाबतचे तपशील देणे आवश्यक आहे.
अर्जुन : कृष्णा, विवरणपत्र दाखल न केल्यास कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागेल?
कृष्ण : अर्जुना जर, कलम १३९ (१) नुसार करदात्याने विवरणपत्र न भरल्यास त्याला नोटीस पाठवली जाईल. नोटिशीमध्ये दिलेल्या मुदतीत विवरणपत्र दाखल करावे लागेल. त्या नंतरही विवरणपत्र न भरल्यास अॅसेसिंग आॅफिसर त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे मूल्यांकन करतील. प्राप्तिकर कायद्यातील कलम २७६ सीसी नुसार करदाते प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास अपयशी ठरल्यास कारावास अथवा दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
मोठा खर्च केला असल्यास भरावे लागणार प्राप्तिकर विवरणपत्र
अर्जुन : कृष्णा, विवरणपत्र दाखल न केल्यास कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:34 AM2020-06-08T02:34:23+5:302020-06-08T02:34:30+5:30