इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) करण्यासाठी सरकारनं पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स रिटर्नसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता सीबीडीटीनं पुन्हा याला मुदतवाढ दिली असून आता ३१ डिसेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स पोर्टलमधील तांत्रिक समस्यांमुळे ही तारीक वाढवली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
"असेसमेंट इयर २०२१-२२ साठी इन्कम टॅक्स रिटर्न करण्याची अखेरची तारीख सुरूवातीला ३१ जुलै होती. त्यानंतर ती वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली. आता पुन्हा एकदा त्याला मुदतवाढ देण्यात आली असून ती ३१ डिसेंबर २०२१ करण्यात आली आहे," असं निवेदन अर्थ मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलं आहे. असेसमेंट इयर २०२१-२२ साठी आतापर्यंत १.१९ कोटी इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती. यापैकी ७६.२ लाख करदात्यांनी रिटर्न भरण्यासाठी पोर्टलच्या ऑनलाइन युटिलिटीचा वापर केला होता.