नवी दिल्ली- प्राप्तिकर परतावा भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आता तुम्हाला 31 ऑगस्ट 2018पर्यंत प्राप्तिकर परतावा भरता येणार आहे. तत्पूर्वी प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत 31 जुलै 2018पर्यंत होती. पण त्या मुदतीत महिन्याभराची वाढ करण्यात आली आहे. वर्ष 2017-18 या आर्थिक वर्षात प्राप्तिकर रिटर्न दाखल करावयाची करदात्यांसाठी शेवटची तारीख वाढवून 31 ऑगस्ट 2018 करण्यात आली आहे.
प्राप्तिकर रिटर्नमध्ये करदात्यांना जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 3 महिने व्हॅट कायदा व 9 महिने जीएसटी कायदा लागू होता. या आधी अप्रत्यक्ष कर कायद्याची उलाढाल व इतर माहिती प्राप्तिकर रिटर्नमध्ये द्यावयाची गरज नव्हती, परंतु आता शासनाने प्राप्तिकर रिटर्नमध्ये जीएसटीची माहिती नमूद करावयास सांगण्यात आले आहे. ज्या व्यक्तीचे उत्पन्न व्यवसायापासून आहे व जो जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहे, त्याला जीएसटीची माहिती द्यावी लागेल.
ज्या व्यक्तीचे उत्पन्न नोकरीपासून व इतर उत्पन्न असेल, तर त्याला प्राप्तिकराचा आयटीआर 1 व आयटीआर 2 दाखल करावा लागतो. आयटीआर 3 मध्ये जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. करदात्याला विक्रीवरील सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी किती आकारला, ती रक्कम नमूद करावी लागेल. ही माहिती करदात्याला जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक लायबलिटी रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागेल.
करदात्याला खरेदीवरील सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटीच्या क्रेडिटची माहिती द्यावी लागेल. ही माहिती करदात्याला जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागेल. करदात्याला सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटीची माहिती रिटर्नमध्ये नमूद करावी लागेल. जर शासनाकडून जीएसटीचा रिफंड येणे बाकी असेल, तर त्याची माहिती रिटर्नमध्ये द्यावी लागेल. आयटीआर 4मध्ये जीएसटीच्या रिटर्नमध्ये दाखविलेली उलाढालीची रक्कम नमूद करावी लागेल. करदात्याने दाखल केलेल्या जीएसटीआर 1 रिटर्नमधून ती मिळेल, तसेच करदात्याचा जीएसटीचा नंबर या रिटर्नमध्ये नमूद करावा लागेल.
Income tax returns: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत एका महिन्यानं वाढवली
प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 06:39 PM2018-07-26T18:39:11+5:302018-07-26T18:59:20+5:30