Join us

‘प्राप्तिकर’ने उघडकीस आणले ५०० कोटींचे व्यवहार; गुजरातेतील उद्योग समूहावर छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 6:08 AM

कंपनीतील एका प्रमुख व्यक्तीच्या व्हाॅट्सॲप चॅटमधून हे व्यवहार उघडकीस आले आहेत. करपात्र उत्पन्न कमी दाखविण्यासाठी कंपनीने अनेक व्यवहार दडवले

नवी दिल्ली : स्टेनलेस स्टील व धातूच्या पाईपचे उत्पादन करणाऱ्या गुजरातमधील एका कंपनीच्या परिसरात प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या असून, त्यातून ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बेहिशेबी व्यवहार उघडकीस आले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ही माहिती दिली. अहमदाबाद आणि मुंबई येथील समूहाच्या तीन ठिकाणांवर २३ नोव्हेंबर रोजी प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली होती. 

सीबीडीटीने म्हटले की,  या धाडीत असंख्य आक्षेपार्ह दस्तावेज आणि डिजिटल पुरावे सापडले आहेत. यातून बेहिशेबी व्यवहाराच्या नोंदी समोर आल्या आहेत. या व्यवहारांवर कोणताही कर भरणा करण्यात आलेला नाही. कंपनीकडून मोठ्या प्रमाण अनोंदित व्यवहार केले जात होते.

सीबीडीटीने म्हटले की,  कंपनीतील एका प्रमुख व्यक्तीच्या व्हाॅट्सॲप चॅटमधून हे व्यवहार उघडकीस आले आहेत. करपात्र उत्पन्न कमी दाखविण्यासाठी कंपनीने अनेक व्यवहार दडवले, तसेच बनावट व्यावसायिक नोंदी केल्या. यासंबंधीचे पुरावे व्हॉट्सॲप चॅटमधून प्राप्तिकर विभागास मिळाले. उद्योग समूहाचे १८ बँक लॉकर जप्त करण्यात आले आहेत. छापेमारीत ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बेहिशेबी व्यवहार प्राप्तिकर विभागाच्या हाती लागले आहेत. 

टॅग्स :इन्कम टॅक्स