Join us

Indigo वर पडला ९४४ कोटींचा Income Tax बॉम्ब, काय म्हणाली कंपनी? जाणून घ्या प्रकरण

By जयदीप दाभोळकर | Updated: March 31, 2025 10:14 IST

Indigo Income Tax News: इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडला आयकर विभागानं ९४४.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. याबाबत कंपनीला नोटीस मिळाली आहे.

Indigo Income Tax News: इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडला आयकर विभागानं ९४४.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. याबाबत कंपनीला नोटीस मिळाली आहे. हा दंड चुकीच्या पद्धतीनं लावण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या आदेशाविरोधात कंपनी कायदेशीर कारवाई करणार आहे. या दंडाचा आपल्या कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही, असं कंपनीनं म्हटलंय.

२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ९४४.२० कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश आयकर विभागाकडून मिळाले आहेत, अशी माहिती इंडिगोने रविवारी दिली. कलम १४३ (३) अन्वये मूल्यांकन आदेशाविरोधात कंपनीनं आयकर आयुक्तांकडे (अपील) दाखल केलेलं अपील फेटाळण्यात आलंय, या गैरसमजातून आयकर प्राधिकरणानं हा आदेश दिल्याचं कंपनीने बीएसईला दिलेल्या माहितीत म्हटलंय. किंबहुना ते अपील अजूनही प्रलंबित आहे.

'आदेश चुकीचा आणि निराधार'

हा आदेश चुकीचा आणि निराधार असल्याचं इंडिगोचं म्हणणं आहे. यामुळे आपल्या आर्थिक कामकाजावर किंवा इतर कामांवर फारसा परिणाम होणार नाही, असा कंपनीचा विश्वास आहे. इंडिगोनं जारी केलेल्या निवेदनात, आयकर प्राधिकरणाने दिलेला आदेश कायद्यानुसार नाही आणि तो चुकीचा आणि निराधार आहे, असं कंपनीचं ठाम मत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे कंपनी त्याला विरोध करेल आणि या आदेशाविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करेल. त्यामुळे या आदेशाचा कंपनीच्या आर्थिक, ऑपरेशनल किंवा इतर कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

टॅग्स :इंडिगोइन्कम टॅक्स