Income Tax Rules: अलीकडे आयकर विभागाने आपल्या एका नियमात बदल केला आहे. या नवीन नियमाचा करदात्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही जर परदेशात कर भरले असतील तर तुम्ही मूल्यांकन वर्ष संपेपर्यंत त्यावर क्रेडिटचा दावा करू शकता. आयकर विभागाने यासंदर्भात ट्विट करून ही माहिती दिली आहे. पण ही सवलत फक्त त्यांनाच मिळेल ज्यांनी त्यांचे आयकर विवरणपत्र म्हणजेच प्राप्तिकर रिटर्न निर्धारित मुदतीत भरले आहे.
आयकर विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फॉर्म क्रमांक ६७ मध्ये दिले जाणारे विवरण आता संबंधित कर निर्धारण वर्ष संपेपर्यंत दिले जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे सीबीडीटीने ही दुरुस्ती पूर्वलक्षीपणे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा आहे की, यामुळे चालू आर्थिक वर्षात सादर केलेल्या सर्व एफटीसी क्रेडिट दाव्यांवर ही सुविधा मिळू शकते.
नेमका काय बदल झाला?
आत्तापर्यंत परदेशात जमा केलेल्या कराचे क्रेडिट (एफटीसी) फक्त आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म-६७ मूळ विवरणपत्र भरण्याच्या देय तारखेपर्यंत सबमिट केले, तरच घेतले जाऊ शकते. या तरतुदीमुळे भारताबाहेर भरलेल्या करासाठी मर्यादित दावा केला जाऊ शकतो. ही समस्या लक्षात घेऊन सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) आता एफटीसीसाठी दावा करण्याशी संबंधित तरतुदी बदलून करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता परदेशात भरलेल्या करावर भारतात क्रेडिट क्लेम करण्यासाठी फॉर्म-६७ चे स्टेटमेंट संबंधित मूल्यांकन वर्ष संपेपर्यंत सादर केले जाऊ शकते.
दरम्यान, या बदलाची खूप गरज होती आणि आता अशा करदात्यांना देखील मोठा दिलासा मिळेल, ज्यांनी देय तारखेनंतर म्हणजेच उशीरा आयकर रिटर्न दाखल केला आहे. या निर्णयामुळे व्यवसाय करण्याच्या सुलभतेला चालना मिळेल. तसेच हा मोठा दिलासा आहे कारण आता रिटर्न भरल्यानंतरही एफटीसीवर दावा केला जाऊ शकतो. सहगल म्हणतात की यामुळे एफटीसीशी संबंधित कर विवाद कमी होतील, अशी मते तज्ज्ञ मंडळींकडून व्यक्त करण्यात आली आहेत.