Join us

इनकमिंगसाठी 35 ऐवजी 75 रुपये महिना, कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 8:41 AM

जिओ कंपनीचे इंटरनेट वापरण्यावर अनेक नागरिकांचा कल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयडीया, व्होडाफोन, ऐअरटेल या कंपनीच्या ग्राहकांना किमान 35 रुपयांचे रिचार्ज करा अन्यथा तुमची सेवा खंडीत होईल असा मेसेज कंपनीकडून केला जात आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून विविध सिम कार्ड कंपन्यांच्या नेटवर्क मध्ये अडचणी येत असताना आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 35 रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य झाले  आहे. अन्यथा तुमची आऊटगोईंग सेवा बंद होऊ शकते. तसेच सिमकार्डही काही दिवसात बंद होऊ शकते अशी माहिती सिमकार्ड कंपनीतील सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, एअरटेलचा कमीत कमी रिचार्ज 75 रुपये असू शकेल, असे संकेत भारती एअरटेल कंपनीच्या सुनिल मित्तल यांनी दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या सीमकार्डमध्ये महिनाकाठी 35 ऐवजी 75 रुपये बॅलन्स असावा लागणार आहे. 

Exclusive : लाईफटाईमसाठी 1000 रुपये मोजले...मग आता पुन्हा 35 रुपये कशासाठी?

सिमकार्ड कंपन्यांच्या शर्यतीत जेव्हापासून जिओ कंपनीने उडी घेतली आहे. तेव्हापासून अनेक मोठ मोठ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून काही प्रतिष्ठीत कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये अनेक अडचणी येत आहेत. कॉल ड्रॉप होणे, फोरजी रिचार्ज केलेले असताना फोरजीचा स्पीड न मिळणे, अनेक ठिकाणी नेटवर्क नसणे अशा असंख्य समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांना आपल्या फोनमध्ये दोन सिमकार्डचा वापर करावा लागत आहे. 

जिओ कंपनीचे इंटरनेट वापरण्यावर अनेक नागरिकांचा कल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आयडीया, व्होडाफोन, ऐअरटेल या कंपनीच्या ग्राहकांना किमान 35 रुपयांचे रिचार्ज करा अन्यथा तुमची सेवा खंडीत होईल असा मेसेज कंपनीकडून केला जात आहे. अनेकांचे सिमकार्डही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच त्रस्त असलेले ग्राहक सिम बंद होत असल्याने अधिक त्रस्त होत आहेत. त्यातच, आता 35 ऐवजी 75 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार असल्याचं समजते. कारण, एअरटेलचा कमीत कमी रिचार्ज 75 रुपयांचा असणार आहे, असे संकेत भारती एअरटेलच्या सुनिल मित्तल यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात ग्राहकांना इनकमिंग सुविधा सुरू ठेवण्यासाठी कमीत कमी 75 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. दरम्यान, एअरटेलने कंपनीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये नोव्हेंबर महिन्यातच अनेक बदल केले असून कमीत कमी 35 रुपयांचा रिचार्जही अनिवार्य केला आहे. दरम्यान, ट्रायकडून अशा कंपन्यांना नोटीस पाठविण्यात आले आहे. पण, या कंपन्यावर अद्याप कुठलिही कारवाई करण्यात आली नाही.  कारण, काही वर्षापूर्वी 999 रुपयांत लाईफ टाईम इनकमिंग फ्री अशी जाहिरात करुन कंपन्यांनी ग्राहकांना सीमकार्ड विकले होते. तरीही, आता 35 रुपये महिन्याचा रिचार्ज अनिवार्य करण्यात येत आहे.  

टॅग्स :मोबाइलएअरटेल