Join us

डाळी, खाद्य तेलाच्या साठामर्यादेला मुदतवाढ

By admin | Published: September 22, 2016 4:07 AM

डाळी, खाद्य तेले आणि तेलबिया यांच्या साठ्यावर घालण्यात आलेल्या मर्यादेस केंद्र सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

नवी दिल्ली : साठेबाजी व वाढत्या किमती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डाळी, खाद्य तेले आणि तेलबिया यांच्या साठ्यावर घालण्यात आलेल्या मर्यादेस केंद्र सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. आता ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंत मर्यादा नियंत्रण आदेश कायम राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. मर्यादेची मुदत महिनाअखेरीस संपत होती. ही मर्यादा व्यापाऱ्यांसाठी आहे. केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान म्हणाले की, डाळी, खाद्य तेले आणि तेलबिया यांच्या साठ्यावरील मर्यादेस पुढील वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. साठे मर्यादेस सर्व राज्यांनी पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल. साठेबांजावर कारवाई करण्याचे अधिकारही राज्यांना मिळतील. या अधिकारांत राज्य सरकारने आयातदार, मिलमालक, ठोक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांच्यासाठी नियंत्रण आदेश जारी करू शकतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)>उत्पादन घटले, मागणी मात्र वाढलीजीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार साठे मर्यादा आदेश जारी करण्यात आला आहे. भारतातील डाळी आणि तेलांचे उत्पादन मागणीपेक्षा कमी आहे. त्यामुळे भारत याबाबतीत पूर्णत: आयातीवरच अवलंबून आहे. दुष्काळामुळे देशांतर्गत उत्पादन गेल्या दोन वर्षांपासून घटलेले आहे. त्या तुलनेत मागणी मात्र वाढलेली आहे.