नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षामध्ये कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला असला तरी सरकारला मिळणाऱ्या अबकारी करांपासूनच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ४८ टक्के अधिक अबकारी कर जमा झाला असून त्याचे कारण पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जात असलेला विक्रमी दराचा अबकारी कर होय. केंद्रीय महालेखापाल कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर, २०२० या काळामध्ये जमा झालेला अबकारी कर १,९६,३४२ कोटी रुपये एवढा आहे. आधीच्या वर्षाच्या याच कालावधीमध्ये जमा झालेल्या अबकारी कराची रक्कम १,३२,८९९ कोटी एवढी होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये देशामधील डिझेलची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे एक लाख लीटरने कमी झाली आहे. असे असूनही अबकारी कराची रक्कम अधिक जमा झाली.
दोन वेळा केली गेली वाढ -चालू आर्थिक वर्षामध्ये सरकारने दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर वाढविला आहे. या दोन वेळेला मिळून पेट्रोलवर १३ रुपये प्रतिलीटर तर डिझेलवर १६ रुपये प्रतिलीटर असा अबकारी कर वाढला आहे. सध्या पेट्रोलवर लीटरमागे ३२.९८ रुपये तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रतिलीटर या दराने अबकारी कराची आकारणी होत आहे. केंद्र सरकारने वाढविलेल्या करामुळे सरकारचा महसूल वाढला असून सरकार मालामाल झाल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. २०१७ मध्ये देशात जीएसटी लागू झाला असला तरी पेट्रोलियम उत्पादने त्याबाहेर ठेवण्यात आली आहेत.