लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : राज्यातील उद्योगवाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना अधिकाधिक वित्तपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातील बँकांना दिले. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी मदत व्हावी म्हणून डिसेंबरअखेरच्या तिमाहीत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी एक लाख ९६ हजार ५७४ कोटी रुपयांचा अर्थपुरवठा केला गेला आहे. राज्यातील उद्योगांसाठी ही समाधानाची बाब आहे.राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी होणाऱ्या वित्तपुरवठा व या उद्योगांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात गुुरुवार, २५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उच्चाधिकार समितीची ऑनलाइन बैठक झाली. यामध्ये या उद्योगांच्या स्थितीचा आढावा घेऊन अधिकाधिक वित्तपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक संगीता ललवाणी, वरिष्ठ संचालक अजय मिचिरिया, उच्चाधिकार समितीचे महाराष्ट्र-गोवा सदस्य संजय दादलिका, राज्याच्या उद्योग संचालक कार्यालयाचे अधिकारी यांच्यासह राज्यातील विविध बँकांचे तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचे प्रमुख सहभागी झाले होते.कोरोनाच्या सावटाखाली उद्योगांची स्थिती पाहता उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या वित्तपुरवठ्याची गरज असून या उद्योगांना अधिकाधिक वित्तपुरवठा व्हावा व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव राज्याचे उच्चाधिकार समितीचे सदस्य संजय दादलिका यांनी मांडला. त्याला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आरबीआय प्रतिनिधींनी अधिकाधिक वित्तपुरवठ्याविषयी सूचना दिल्या. यामध्ये या उद्योगांसाठी वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याविषयी राज्यांना शिफारस केल्याची माहिती दादलिका यांनी दिली. यामुळे आता या उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या असून गेल्या वर्षी लॉकडाऊन काळातील बसलेल्या झळांमधून सावरण्यासही मदत होणार असल्याचा विश्वास उद्योगक्षेत्रातून व्यक्त होत आहे.राज्यातील अनेक बँकांमध्ये मोठ्या खात्यांची थकबाकी वाढल्याने ती नियमित करण्यासाठी आरबीआयने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही या वेळी दादलिका यांनी केली.
उद्योगवाढीसाठी अधिकाधिक वित्तपुरवठा करा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 5:23 AM