Join us  

वित्तसंस्थांच्या खरेदीमुळे पहिला सप्ताह वाढीचा

By admin | Published: January 09, 2017 1:12 AM

वस्तू आणि सेवाकर लागू होण्याबाबतची अनिश्चितता, देशाच्या उत्पादन क्षेत्राची घसरलेली स्थिती, अमेरिकेचे व्हिसाबाबतचे धोरण अशा नकारात्मक बाबींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत

वस्तू आणि सेवाकर लागू होण्याबाबतची अनिश्चितता, देशाच्या उत्पादन क्षेत्राची घसरलेली स्थिती, अमेरिकेचे व्हिसाबाबतचे धोरण अशा नकारात्मक बाबींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत वित्तसंस्थांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे नवीन वर्षाचा पहिला सप्ताह हा निर्देशांकाच्या वाढीने साजरा झाला.बाजारात नवीन वर्षाचा प्रारंभ हा घसरणीने झाला असला तरी नंतर सप्ताहामध्ये झालेल्या चांगल्या वाढीने निर्देशांक वाढीव पातळीवर बंद होऊ शकला. सप्ताहामध्ये मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक १३२.७७ अंश म्हणजेच ०.५० टक्क्यांनी वाढून २६७५९.२३ अंशांवर बंद झाला. सप्ताहामध्ये हा निर्देशांक २७००९.६१ ते २६४४७.०६ अंशांदरम्यान हेलकावत होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ५८ अंशांनी (०.७ टक्के) वाढून ८२४३.८० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही अनुक्रमे २.४ आणि ३.२ टक्के वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजारात सप्ताहामध्ये ३३३३१.७१ कोटी रुपयांची उलाढाल झाली.वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्यानंतर राज्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईबाबत अद्यापही एकमत न झाल्याने राज्याच्या अर्थमंत्र्यांबरोबरची बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. त्यामुळे १ जुलैपासून तरी जीएसटी लागू होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. बाजारावर याचा नकारात्मक परिणाम झाला.देशातील परचेस मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) घसरला. यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये मंदी दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यात ५२.३ असलेला हा निर्देशांक डिसेंबर महिन्यात ४९.६ झाला. त्यामध्ये सन २०१६मधील ही पहिलीच घट आहे. मात्र गेल्या आठ वर्षांतील सर्वांत मोठी मासिक घट नोंदविली गेल्याने बाजार चिंतित आहे.अमेरिकेच्या एच१बी व्हिसाबाबत अमेरिकन कॉँग्रेसमध्ये दाखल झालेल्या विधेयकांमुळे माहिती तंत्रज्ञान आस्थापनांचे भाव घसरलेले दिसून आले.सन २०१६ या वर्षामध्ये चीनच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये ३६० अब्ज डॉलरने घट झाली आहे. चीनच्या गंगाजळीत आता ३०११ अब्ज डॉलर आहेत. असे असले तरी चीनची परकीय चलन गंगाजळी अद्यापही जगातील प्रथम क्रमांकाची आहे.गेल्या सलग सहा महिन्यांपासून चीनच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये सातत्याने घट होत आहे. आॅक्टोबर महिन्यात ४६ अब्ज, नोव्हेंबरमध्ये ७० अब्ज तर डिसेंबर महिन्यामध्ये ४१ अब्ज डॉलरने गंगाजळी घटल्याचे सांगण्यात येत आहे.च्गेल्या वर्षीही चीनच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये घट झाली होती. चीनचे चलन युआन स्थिर करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे ही घट झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या युआनचे मूल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे.