नवी दिल्ली : यंदाच्या (२0१६-१७) खरीप हंगामात १३५.0३ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज भारताचे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी जाहीर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या उत्पादनात ९ टक्के वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी म्हणजेच २0१५-१६च्या खरीप हंगामात १२४.0१ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते. यंदा डाळींचे उत्पादन ५७ टक्क्यांनी वाढणार आहे. उत्पादन वाढल्यामुळे महागाईचा पारा उतरेल, असा आशावाद कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला. आधीच्या दोन वर्षांत खरीप आणि रबी अशा दोन्ही हंगामांत उत्पादन घटून २५२ दशलक्ष टनांवर आले होते. २0१६-१७ या वर्षाचा पहिला अन्नधान्य उत्पादन अंदाज कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी जाहीर केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या खरिपात तांदळाचे ९३.८८ दशलक्ष टन होईल. हा सार्वकालिक विक्रम आहे. गेल्या वर्षी खरिपात ९१.३१ दशलक्ष टन तांदूळ उत्पादन झाले होते. डाळींचे उत्पादन ८.७ दशलक्ष टनावर जाईल. गेल्या वर्षी ते ५.५६ दशलक्ष टन होते. यंदा तूर आणि उडदाचे उत्पादन अनुक्रमे ४.२९ दशलक्ष टन आणि २.0१ दशलक्ष टन होईल. भरड धान्याचे उत्पादन २७.१७ दशलक्ष टनावरून ३२.४५ दशलक्ष टनावर जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
यंदाच्या खरिपात तेलबियांचे उत्पादन २३.३६ दशलक्ष टन होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी ते १६.५९ दशलक्ष टन होते. नगदी पिकांबाबत कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, यंदा कापसाचा पेरा घटला असला तरी उत्पादन वाढून ३२.१२ दशलक्ष गाठी होईल.
गेल्या वर्षी ३0.१४ दशलक्ष गाठींचे उत्पादन झाले होते. एका गाठीत १७0 किलो कापूस असतो. उसाचे उत्पादन मात्र घटून ३0५.२४ दशलक्ष टनावर येणार आहे. गेल्या वर्षी ३५२.१६ दशलक्ष टन उसाचे उत्पादन झाले होते. ताग आणि अंबाडीचे उत्पादनही घटून १0.४ दशलक्ष गाठींवर येईल.
अन्नधान्य उत्पादन वाढणार
यंदाच्या (२0१६-१७) खरीप हंगामात १३५.0३ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज भारताचे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी जाहीर केला.
By admin | Published: September 23, 2016 01:49 AM2016-09-23T01:49:55+5:302016-09-23T01:49:55+5:30