Join us  

स्वयंपाकाला महागाईची फोडणी, मसाल्याच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ; जाणून घ्या का वाढले दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 11:36 AM

१५ जानेवारीपासून हळदीची आवक सुरू झाली आहे. तरीसुद्धा, २०२२ मध्ये, आतापर्यंत  किमती कमी होण्याऐवजी ५ टक्केने वाढल्या आहेत. हळदीच्या दरात जानेवारीमध्ये २५ टक्केपर्यंत वाढ झाली आहे. तर जिरे आणि धने यांचे दर अनुक्रमे २५ आणि २३ टक्क्यांनी वाढले आहेत.

 मुंबई : वाढत्या महागाईच्या काळात स्वयंपाकघराचे बजेटही दिवसेंदिवस कोलमडून जात आहे. खाद्यतेल आधीच महाग असून आता मसाल्यांच्या किमतीही झपाट्याने वाढल्या आहेत. २०२२ मध्ये आतापर्यंत हळद, हिंग, मिरची, जायफळ, दालचिनी, वेलची, जिरे आणि धने या मसाल्यांच्या दरात तब्बल २५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या मसाल्यांच्या किमती ७१ टक्क्यांनी वाढल्या असून, यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे.

१५ जानेवारीपासून हळदीची आवक सुरू झाली आहे. तरीसुद्धा, २०२२ मध्ये, आतापर्यंत  किमती कमी होण्याऐवजी ५ टक्केने वाढल्या आहेत. हळदीच्या दरात जानेवारीमध्ये २५ टक्केपर्यंत वाढ झाली आहे. तर जिरे आणि धने यांचे दर अनुक्रमे २५ आणि २३ टक्क्यांनी वाढले आहेत.

केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की, मसाले सध्या तरी महागच राहणार आहेत. मार्चपासून जिरे आणि धने नव्याने बाजारात आल्यानंतर यात थोडी घट होईल. मात्र, त्यानंतर यात आणखी वाढ होईल. पुढील सहा महिन्यांत हळद १२,५०० रुपये, जिरे २५ हजार रुपये आणि धने १८ हजार रुपये क्विंटलपर्यंत  जाण्याची शक्यता आहे. ही वाढ २४ ते ६६ टक्के असून, याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.

काळी मिरचीही महागली- गेल्या दोन वर्षांत भाज्यांना फोेडणी देण्यासाठी वापरण्यात येणारी काळी मिरचीही महागली असून, दरात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. - मसाले महाग झाल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दरही काही प्रमाणात महाग होणार असून, त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

का वाढले दर?अनेक मसाल्यांचे उत्पादन हे प्रामुख्याने दक्षिण भारतात घेतले जाते. मात्र, २०२१ मध्ये दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. यासह आयात-निर्यात धोरणामुळेही मसाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. 

टॅग्स :महागाईभारत