नवी दिल्ली - सतत वाढणारे भाव पाहता सोन्याने वर्षभरात गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा दिला आहे. ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेत सोन्याचे भाव सध्या ३८ टक्क्यांनी वाढले आहेत. या काळात निफ्टीने २८ टक्के इतका परतावा दिला आहे. सोन्याची मागणी भविष्यात कायम राहण्याची चिन्हे असल्याने पुढील वर्षभरात सोन्याचे दर २० टक्के वाढतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
अमेरिकेतील केंद्रीय बँकेचे व्याजदर सध्या ५.२५ ते ५.५ टक्के दरम्यान आहेत. या महिन्यात बँक व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. यात विलंब झाल्यास मंदीच्या भीतीने सोन्याची मागणी वाढणार आहे. चीनमध्ये सोन्याची सर्वाधिक खरेदी केली जाते. चीनमधून सोन्याला असलेली मागणी कायम आहे.
मागणी का वाढणार?
- सध्या जागतिक स्तरावर वाढलेले भूराजकीय तणाव पाहता सोन्याची मागणी कायम राहील.
- अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी मागील काही दिवसांत सोने खरेदीचा सपाटा लावला होता. त्यामुळे ही मागणी कायम राहिली.
-आर्थिक अनिश्चितता आणि घोंगावत असलेले मंदीचे संकट यामुळे लोकांचा सोन्यातील गुंतवणुकीवरच विश्वास वाढला आहे.
बाजारापेक्षा सोनेच सुरक्षित
- सरकारने जुलैमध्ये सोन्यावरील आयात कर १५ टक्केवरून घटवून ६ टक्के इतका केला. २०१३ नंतरचा हा सर्वात कमी ठरला आहे. यामुळे तस्करीत घट होणार आहे. त्यामुळे भारतात सोन्याची मागणी कायम राहण्यास मदत होणार आहे.
- नागरिकांचा बाजारात गुंतवणुकीकडे कल वाढला असला तरी सध्या बाजार निर्देशांक उच्चांकी आहेत. सरकारी रोख्यांच्या किमतीही फारशा वाढणार नसल्याने सोने हाच एक गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय शिल्लक उरतो.