Join us

व्याजदरात पुन्हा वाढ?, महागाई आणखी वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 8:06 AM

केंद्राने दिलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यात महागाई दर तीन वर्षांत पहिल्यांदा ५ टक्क्यांवर गेला.

मुंबई : महागाई दराने अपेक्षेहून अधिक ५ टक्क्यांचा स्तर गाठल्याने रिझर्व्ह बँक चिंतेत आहे. त्यामुळे आगामी पतधोरण आढावा बैठकीत बँकेकडून व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  वाढत्या इंधनदरांमुळे महागाई वाढण्याची भीती असतानाच, आरबीआयने जून महिन्याच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात चार वर्षांनी पहिल्यांदा व्याज दरात पाव टक्का वाढ केली. वैयक्तिक कर्जाद्वारे बाजारात येणाऱ्या अतिरिक्त पैशांवर यामुळे नियंत्रण येऊन महागाई ४.७५ टक्क्यांदरम्यान राहील, असा बँकेचा अंदाज होता, पण केंद्राने दिलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यात महागाई दर तीन वर्षांत पहिल्यांदा ५ टक्क्यांवर गेला. त्यातच जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून इंधनदरही वाढते आहेत. यामुळे चालू महिन्यात महागाई आणखी वाढण्याची भीती असून, त्यासंबंधी बँकेत बैठक झाली.

बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक ३० जुलै ते १ आॅगस्ट आहे. १ आॅगस्टला पतधोरण जाहीर केले जाईल. त्यामध्ये बँकेकडून रेपो दरात (बँकांना दिल्या जाणाºया कर्जावरील व्याज) अर्धा टक्का वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई ध्यानात घेता काय करता येईल, यासंबंधीचा आढावा बँकेच्या उच्चाधिका-यांनी शुक्रवारच्या बैठकीत घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

कर्जे महागणार?आरबीआयने जून महिन्यात रेपो दरात पाव टक्का वाढ करताच विविध बँकांची गृह कर्जांवरील व्याज दर ०.१० ते ०.२५ व वैयक्तिक कर्जांवरील ०.२० टक्के वाढला. यात आणखी अर्धा टक्का वाढ झाल्यास आॅगस्टपासून कर्जे तब्बल १ टक्क्यापर्यंत महाग होण्याची शक्यता आहे.