नवी दिल्ली : देशाच्या उत्पादन क्षेत्राच्या पर्चेस मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय)ची जून महिन्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. मे महिन्यापेक्षा पीएमआयमध्ये वाढ झाली असली तरी त्याने अद्यापही ५० अंशांची पातळी ओलांडली नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर अद्यापही कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पीएमआय ५०पेक्षा कमीच राहिला आहे.
आयएचएस मार्किट इंडियाने जून महिन्यातील भारताचा उत्पादन क्षेत्राचा पीएमआय जाहीर केला आहे. जूनमध्ये हा निर्देशांक ४७.२ एवढा झाला आहे. मे महिन्यात देशाचा पीएमआय अवघा ३०.८ एवढा होता. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंद्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच देशाच्या पीएमआयमध्ये घट होताना दिसून आली आहे.
जून महिन्यामध्ये लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सवलती दिल्यानंतर उद्योग, व्यवसाय तसेच व्यापार थोड्याफार प्रमाणात सुरू करण्यात आले आहेत. याचा परिणाम म्हणून देशातील पर्चेस मॅनेजर इंडेक्स थोड्या प्रमाणात वाढला आहे. अद्यापही काही भागामध्ये लॉकडाऊन सुरू असून, तेथील परिस्थिती सुधारल्याशिवाय ते मागे घेतले जाण्याची शक्यता नाही. काही प्रमाणात मागणी वाढली असली तरी उत्पादन मात्र फारसे वाढलेले दिसून येत नाही. त्यामुळे पीएमआय कमी राहिला आहे.पर्चेस मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) हा उत्पादन क्षेत्रातील कामगिरी जोखण्याचा निर्देशांक मानला जातो. विविध कंपन्यांकडून किती कच्च्या मालाची खरेदी होते यावर पीएमआय काढला जातो. ज्यावेळी पीएमआय ५० पेक्षा अधिक असतो तेव्हा उत्पादनात वाढ होत असल्याचे मानले जाते.