नवी दिल्ली : भारतातील किमान वेतनात दुपटीने वाढ करण्याचा विचार केंद्र सरकारने चालविला आहे. त्यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून किमान वेतन ठरविण्याच्या फॉर्म्युल्यात बदल करण्यात येत आहे. या संबंधीचा निर्णय झाल्यानंतर भारतातील किमान वेतन प्रतिमाह १८ हजार रुपये होईल. याचाच अर्थ, १८ हजारांपेक्षा कमी वेतनात कोणालाही कामावर ठेवता येणार नाही.
कुटुंबातील सदस्य संख्येनुसार किमान वेतन ठरविण्यात येते. सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार एका कुटुंबात तीन सदस्य (युनिट) गृहीत धरण्यात येतात. पती, पत्नी हे दोन सदस्य आणि दोन मुले मिळून एक सदस्य, असे एकूण तीन सदस्यांचे कुटुंब गृहीत धरले जाते. यात बदल करून एका कुटुंबात सहा सदस्य गृहीत धरण्याचा प्रस्ताव श्रम मंत्रालयासमोर विचारार्थ आहे. या प्रस्तावानुसार अवलंबून असलेले आई-वडील यांनाही कुटुंबाचे सदस्य मानण्यात येणार आहे, तसेच दोन मुलांना मिळून एकच सदस्य न मानता स्वतंत्रपणे दोन सदस्य म्हणून गृहीत धरण्यात येईल. अशा प्रकारे पती, पत्नी, आई, वडील आणि दोन मुले, असे सहा सदस्यांचे एक कुटुंब मानण्यात येईल. त्यानुसार, किमान वेतनात आपोआप दुप्पट वाढ होईल. किमान वेतन कायदा १९४८ नुसार किमान वेतन ठरविण्यात येते. हा कायदा ४७ केंद्रीय प्रतिष्ठानांना, तसेच देशातील शेती आणि बिगर शेती कामगारांना लागू आहे. या कायद्यानुसार, किमान वेतनाचा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. त्यात आता बदल करण्यात येणार आहे.
श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले की, देशातील किमान वेतनाचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. नव्यानेच पुनर्गठित करण्यात आलेल्या किमान वेतनविषयक केंद्रीय सल्लागार बोर्डाच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आधीच्या बोर्डाची बैठक २०१० मध्ये झाली होती.
भारतातील किमान वेतनात होणार वाढ!
भारतातील किमान वेतनात दुपटीने वाढ करण्याचा विचार केंद्र सरकारने चालविला आहे. त्यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून किमान वेतन ठरविण्याच्या फॉर्म्युल्यात बदल करण्यात येत आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:32 AM2017-08-05T00:32:38+5:302017-08-05T00:33:24+5:30