सिंगापूर : कमकुवत झालेला डॉलर, खरेदीचे सौदे आणि तेल उत्पादक राष्ट्रांकडून उत्पादनात कपात होण्याच्या वदंतेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी तेलाचे भाव वाढले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे मार्च महिन्याच्या डिलिव्हरीचे तेल ३६ सेंट्सने (१.१२ टक्के) वाढून ३२.६४, तर ब्रेंटचे तेल (एप्रिलची डिलिव्हरी) २९ सेंट्सने (०.८३ टक्के) वधारून ३५.३३ अमेरिकन डॉलरवर गेले. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने बुधवारी म्हटले आहे की, जगात तेलाचा प्रचंड वापर करणाऱ्या देशांनी कच्च्या तेलाचा साठा २९ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात ७.८ दशलक्ष बॅरल्स एवढा केला आहे. हा साठा बाजारपेठेच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट आहे व प्रथमच हा साठा विक्रमी ५०२.७ दशलक्ष बॅरल्सवर गेला आहे. बाजारात तेलाचा अति पुरवठा होत असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून किमती सतत कमी होत आहेत. (वृत्तसंस्था)
कच्च्या तेलाच्या भावात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2016 3:19 AM