नवी दिल्ली : गहू आणि डाळवर्गीय धान्याच्या किमान आधारभूत किमतींत (एमएसपी) सरकारने मंगळवारी वाढ केली. गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत ११० रुपयांची, तर डाळींच्या किमतीत २०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या पिकांच्या उत्पादनवाढीस प्रोत्साहन देऊन, किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने ही वाढ करण्यात आली आहे.ही वाढ २०१७-१८च्या रब्बी हंगामासाठी आहे. मंत्रिमंडळ समितीने ११० रुपयांच्या वाढीस मान्यता दिल्यानंतर, २०१७-१८च्या रब्बी हंगामासाठी गव्हाची किमान आधारभूत किंमत १,७३५ रुपये क्विंटल झाली आहे. गेल्या वर्षी ती १,६२५ रुपये क्विंटल होती. हरभरा व मसूर डाळीच्या आधारभूत किमतींत २०० रुपये वाढ केल्याने, हरभºयाची किमान आधारभूत किंमत ४,२०० रुपये क्विंटल, तर मसूरची किंमत ४,१५० रुपये क्विंटल झाली.तेलबियांच्या किमान आधारभूत किमतींतही लक्षणीय वाढ केली आहे. मोहरी आणि सूर्यफुलाचा त्यात समावेश आहे. कृषी खर्च व किंमत आयोगाने केलेल्या शिफारशींना अनुसरून किमान आधारभूत किमतींत वाढ करण्यात आली आहे.>पेरणीआधी ठरला भावगहू हे रब्बीचे मुख्य पीक आहे, तसेच ते भारतातील बहुतांश राज्यातील मुख्य खाद्यान्नही आहे. गव्हाच्या पेरणीस याच महिन्यात सुरुवात होईल. येत्या एप्रिलपासून नवा गहू बाजारात येईल. पेरणी सुरू होण्याआधीच किमान आधारभूत किमतींत वाढ केल्यामुळे गव्हाच्या पिकांखालील क्षेत्रात वाढ होईल. त्यातून संबंधित धान्याची उपलब्धता वाढून किमती नियंत्रणात राहतील.
गहू, डाळींच्या आधारभूत किमतींमध्ये केली वाढ, मंत्रिमंडळ समितीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 4:14 AM