कोची : भारतातील प्रमुख शहरांत लोकांच्या ‘घर खरेदी सामर्थ्या’त वाढ झाली असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. जेएलएल इंडियाने जारी केलेल्या ‘घर खरेदी सामर्थ्य निर्देशांका’त (जेएलएल-एचपीएआय) वाढ झाली आहे.
‘जेएलएल-एचपीएआय’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, यंदा कोविड-१९मुळे कौटुंबिक उत्पन्नात निवासी मालमत्तांच्या तुलनेत मोठी घसरण झाली असतानाही घर खरेदी सामर्थ्य वाढले आहे. २०१९ मध्ये ८.९ टक्के असलेला सरासरी गृहकर्ज व्याजदर २०२० मध्ये घसरून ७.५ टक्के झाला आहे. अर्थसाह्य स्वस्त झाल्यामुळे घरखरेदीला बळ मिळण्यास मदत झाली आहे. जेएलएल इंडियाचे सीईओ रमेश नायर यांनी सांगितले की, २०२०च्या तिसऱ्या तिमाहीत गृह बाजारात सुधारणा होत असल्याचे प्राथमिक संकेत स्पष्टपणे दिसून येत आहेत. घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ दिसत आहे. २०२० मध्ये कौटुंबिक उत्पन्नात घट झालेली असतानाही घर खरेदी सामर्थ्य वाढल्याचे दिसून येत आहे.
कोलकाता किफायती
२०१९पर्यंत ‘जेएलएल एचपीएआय’मधून असे दिसून येत होते की, हैदराबाद येथील गृह बाजार सर्वाधिक किफायतशीर होता. २०२० मध्ये कोलकाताने हैदराबादला मागे टाकले आहे. मुंबई शहर हे घरांच्या किफायतशीरपणासाठी निर्धारित करण्यात आलेल्या १०० अंकांच्या खाली कायम राहिली आहे. मात्र, मुंबई सर्वाधिक सुधारणा दर्शविणारे शहर ठरले आहे. जेएलएल-एचपीएआय निर्देशांकात २०११ मध्ये मुंबईचे अंक ४७ होते. २०२० मध्ये ते ९५ झालेे आहेत.