Join us

कोरोनाकाळात झूमच्या वापरात वाढ; युआन यांच्या संपत्तीचे मूल्य १०० अब्ज डॉलरवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 7:05 AM

zoom app : भारतात २,५०० शाळा झूम ॲपच्या सदस्य आहेत. त्याआधारे ऑनलाइन वर्ग होत आहेत. 

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या चार महिन्यांच्या काळात झूम ॲपचा वापर - आधार (यूजर बेस) तब्ब्ल ७० पट वाढल्याचे या ॲपचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी एरिक एस. युआन यांनी सांगितले. युआन यांनी सांगितले की, साथीनंतर ॲपच्या मूल्यांकनाने मोठी झेप घेतली आहे. ॲपचे महत्त्व यापुढेही कायम राहणार आहे. कारण जग आता संकरित कार्यसंस्कृतीकडे स्थलांतरित होत आहे. घर आणि कार्यालये अशा दोन्ही ठिकाणांहून काम होत आहे.कोविड-१९मुळे अचानक लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्हिडिओ कॉन्फरन्स हा लोकांचा मुख्य आधार बनला. कार्यालयीन कामकाज दूरस्थ पद्धतीने सुरू झाले. त्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲपचा वापर नैसर्गिकरीत्या वाढला. आपल्या प्रियजनांशी संपर्क ठेवण्यासाठीही याच ॲपचा आधार घेतला गेला.युआन यांनी सांगितले की, २०२० हे एक ‘क्रेझी’ वर्ष होते. या वर्षातील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात झूमचे भारतातील मोफत वापरकर्ते तब्बल ७० पटींनी वाढले. जगात अन्यत्रही हीच स्थिती होती. एप्रिलमध्ये झुमच्या वापरकर्त्यांची संख्या ३५० दशलक्षांवर गेली. त्याआधीच्या डिसेंबरमध्ये ती अवघी दहा दशलक्ष होती. आमच्या ॲपचा लोकांनी असंख्य कारणांसाठी वापर केला. मी स्वत: ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन योग वर्गात सहभागी झालो. भारतात २,५०० शाळा झूम ॲपच्या सदस्य आहेत. त्याआधारे ऑनलाइन वर्ग होत आहेत. 

युआन यांच्या संपत्तीचे मूल्य १०० अब्ज डॉलरवर युआन यांनी सांगितले की, भारत हा गुणवत्तेचे ‘पॉवरहाउस’ आहे. झूमसारख्याच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये बंगळुरू, चेन्नई आणि इतर शहरांत आहेत. ग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यात झूम इतर कुठल्याही कंपनीपेक्षा अधिक लक्ष देते. त्यासाठी आम्ही सतत ग्राहकांशी बोलत असतो. झूमच्या यशाचे हेही एक कारण असू शकते. झूमच्या यशामुळे युआन यांच्या वैयक्तिक संपत्तीचे मूल्य १०० अब्ज डॉलरवर गेले आहे. याबाबत युआन यांनी सांगितले की, ही आनंददायक बाब आहे. तथापि, आपण त्याचा पाठपुरावा करणार नाही. खरा आनंद इतरांना आनंदी करण्यातून येतो, संपत्तीच्या मूल्यांकनातून नव्हे.

टॅग्स :तंत्रज्ञानव्यवसाय