Join us  

अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 7:07 PM

खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींबाबत आरबीआय सातत्याने चिंता व्यक्त करत आहे. नुकत्याच झालेल्या एमपीसी बैठकीनंतर दास यांनी महागाई हा संथ गतीने चालणारा हत्ती असे संबोधले होते.

देशात महागाई कमालीची वाढली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर काही कमी करण्याचे नाव घेत नाहीय. अशातच महागाई कमी करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याची कबुली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. 

दास यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात महागाईवर भाष्य केले. यामध्ये त्यांनी किरकोळ महागाई दर चार टक्क्यांवर आणण्याचा आरबीआय प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. परंतू अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई कमी करण्याची प्रक्रिया संथ करत असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. या वाढलेल्या किंमतींचा विरोध हा तीव्र असून याचे मुख्य कारण म्हणजे पुरवठ्याशी संबंधीत आव्हाने असल्याचे ते म्हणाले. 

अन्नधान्याच्या किंमतींवर हवामानाच्या परिस्थितीचाही परिणाम होतो. महागाई कमी करण्याचा प्रवास हा शेवटच्या टप्प्यापर्यंत मंदावत असल्याचे आपण काही विकसित अर्थव्यवस्थांमध्ये पाहिले आहे, असेही ते म्हणाले. अनेक अनिश्चितता आहेत. अन्नधान्य चलनवाढीचा दर कायम आहे. गेल्या सात महिन्यांत अन्नधान्याची सरासरी महागाई ८ टक्क्यांच्या आसपास आहे, असेही ते म्हणाले.

खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींबाबत आरबीआय सातत्याने चिंता व्यक्त करत आहे. नुकत्याच झालेल्या एमपीसी बैठकीनंतर दास यांनी महागाई हा संथ गतीने चालणारा हत्ती असे संबोधले होते. खाद्यपदार्थांच्या श्रेणीतील महागाई एप्रिलमधील 8.70 टक्क्यांवरून किरकोळ घसरून 8.69 टक्क्यांवर आली आहे.  

टॅग्स :शक्तिकांत दासभारतीय रिझर्व्ह बँकमहागाई