Join us  

सलग तिसऱ्या सप्ताहात नोंदविली वाढ

By admin | Published: January 16, 2017 12:15 AM

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद यामुळे शेअर बाजारात गतसप्ताह वाढीचा राहिला.

- प्रसाद गो. जोशीनोव्हेंबर महिन्यामध्ये वाढलेला औद्योगिक उत्पादनाचा दर त्याचप्रमाणे ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरामध्ये झालेली घट या देशांतर्गत बाबींसोबतच अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद यामुळे शेअर बाजारात गतसप्ताह वाढीचा राहिला. जागतिक वातावरणही आशादायक होते. सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये बाजार वाढीव पातळीवर बंद झाला.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताह हा तेजीचाच राहिला. दररोज निर्देशांक वाढीव पातळीवर बंद होताना निसला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहामध्ये २७४५९.७५ ते २६७०१.१८ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो २७२३८.०६ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये तो ४७८.८३ अंश म्हणजेच १.८ टक्क्यांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ८४००.३५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा तो १६४ अंश (१.९ टक्के) वाढला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही वाढ झाली.देशातील नोटाबंदीच्या निर्णयानंतरही औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात देशाचे औद्योगिक उत्पादन ५.७ टक्क्यांनी वाढले. या उत्पादनामधील वाढ ही १३ महिन्यांमधील सर्वाेच्च आहे. त्याचप्रमाणे ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरामध्ये घट झाली आहे. हा दर ३.६ टक्क्यांवरून ३.४ टक्के असा कमी झाला आहे. भारतीय अर्थव्यस्थेच्या वाढीचा दर ७ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी असलेली दिसून आली. अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रपरिषद ही त्यांच्या धोरणांबाबत कोणतेही स्पष्ट संकेत देत नसली तरी अमेरिकेतील नोकऱ्या वाढविण्याची त्यांची घोषणा अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येत असल्याचे द्योतक मानले जात आहे. त्यामुळेही जगभरात बाजारांमध्ये खरेदीचे वातावरण दिसून आले.