नवी दिल्ली : कोरोना साथ ओसरल्यानंतर लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल झाला. परिपूर्ण आहाराकडे कल वाढला. परिणामी मांस, डाळींचे पदार्थ, फळे आणि भाज्या आदींचे सेवन लोकांकडून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे जोरदार मागणी असूनही तितक्या प्रमाणात उत्पादन न वाढल्याने फळे आणि भाजीपाल्याचे दर महागले आहेत, असे बाजाराचे विश्लेषण करणाऱ्या ‘क्रिसिल’च्या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
हमी भावाची व्यवस्था नाही
चीननंतर भारत हा जगातील सर्वात मोठा भाजी आणि फळांचा उत्पादक देश आहे. काही भाज्या तर देशात वर्षभर पिकविल्या जातात. परंतु या क्षेत्रामध्ये किमान हमी भावाची किंवा दर नियंत्रणाची कोणती व्यवस्था नाही. सरकारकडून याची खरेदी केली जात नाही, असे जाणकारांनी सांगितले.
साठवणूक सोईअभावी नुकसानीचे प्रमाणही अधिक
देशातील एकूण भाजी आणि फळ उत्पादनात वाढ झाली असली तरी कापणी, पॅकेजिंग, वाहतूक आणि साठवणूक या प्रक्रियेमध्ये याचे मोठे नुकसान होते. नाशवंत फळ आणि भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. देशांतर्गत शीतगृहांची व्यवस्था वाढवली तरी खूप नुकसान टाळता येईल. सध्या होत असलेल्या नुकसानीमुळे ग्राहकांना वाढलेल्या किमतीचा फटका बसतो.
उत्पादनात सातत्य नसल्याचा फटका
देशात डाळी, फळे, भाज्या आदींची सतत वाढती मागणी आहे. परंतु प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात स्थिरता नाही. तसेच मागणी आणि पुरवठा यात कमालीचे अंतर आहे. खाद्य निर्देशांकात अन्नधान्य आणि दुधानंतर भाजीपाल्याचा क्रमांक लागतो. पावसानुसार कांदा आणि बटाट्याच्या किमती ऐन हंगामात सतत वाढल्याचे दिसून येते. यामुळे खाद्य महागाई वाढते. मान्सूनचे आगमन जूनमध्ये उशिरा झाले. जुलैमध्ये जोरदार पाऊस पडला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने पुन्हा ओढ दिली. यामुळे फळे आणि भाजीपाला उत्पादनाला मोठा फटका बसला.
२.५% इतका भाज्यांच्या महागाईचा दर होता २०२० ते २०२३ या कालखंडात भाज्यांच्या महागाईमध्ये सातत्याने अस्थिरता दिसत आहे. २०१६ ते २०१९ या आर्थिक वर्षात भाज्यांची महागाई शून्य टक्के होती. ५.७% इतके देशांतर्गत भाज्यांचे उत्पादन २००३ ते २०२३ या कालखंडात वाढले. परंतु याच काळात प्रतिव्यक्ती भाज्यांचे उत्पादन केवळ दुप्पट झाले. वाढत्या गरजेचा विचार करता हे उत्पादन कमी पडत आहे.