Join us

म्युच्युअल फंडांतील इक्विटी योजनांच्या गुंतवणुकीमध्ये झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 6:52 AM

सलग दुसरा महिना : शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम; अधिक परताव्यासाठी प्रयत्न

प्रसाद गो. जोशीनाशिक : देशामधील कोरोना रुग्णांच्या वाढत असलेल्या प्रमाणामुळे शेअर बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी आपला कल बदलला असून, म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमधील गुंतवणूक दोन महिन्यांपासून वाढू लागली आहे. 

एप्रिल महिन्यामध्ये या योजनांमध्ये ५५२६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड‌्स‌ इन इंडिया (ॲम्फी)च्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शेअर बाजारामधील अस्थिरतेमुळे येत असलेल्या तेजी-मंदीच्या लाटा सहन करण्यापेक्षा आपला पैसा म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमध्ये गुंतविण्यास मार्च महिन्यापासूनच गुंतवणूकदारांची पसंती मिळत आहे. या माध्यमातून आपल्या गुंतवणुकीचा धोका काहीसा कमी करून चांगला परतावा मिळविण्याचा गुंतवणूकदारांकडून प्रयत्न होताना दिसत आहे. मार्च महिन्यापाठोपाठ एप्रिलमध्येही इक्विटी योजनांमध्ये मोठी गुंतवणूक झालेली दिसून आली आहे. 

मार्चमध्ये या योजनांमध्ये ४७७३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. याआधीचे दहा महिने या क्षेत्रामधील गुंतवणूक काढून घेतली जात होती. क्लोज एण्डेड योजनांमधून मात्र रक्कम काढून घेतली गेली आहे. कर बचतीसाठी केल्या जाणाऱ्या म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्यामध्ये या योजनांमध्ये कोणतीही नवीन गुंतवणूक झालेली नाही मात्र यामधून १०४.३६ कोटी रुपये काढून घेतले गेले आहेत. एप्रिल महिन्यात त्यामध्ये वाढ होऊन १५४.५९ कोटी रुपये काढले गेले आहेत. दरमहा म्युच्युअल फंडांमध्ये केली जाणारी गुंतवणूक (एसआयपी) मार्च महिन्यामध्ये वाढलेली आहे. मार्च महिन्यात या योजनांमध्ये ९१८२ कोटी रुपये गुंतविले गेले आहेत, तर एप्रिल महिन्यामध्ये ८५९६ कोटी रुपये एसआयपीच्या माध्यमातून गुंतविले गले आहेत. या महिन्यात १७.०८ लाख नवीन खाती सुरू झाली तर ७.०८ लाख खाती बंद केली गेली. याचाच अर्थ या महिन्यात सात लाख नवीन एसआयपी खाती सुरू झाली आहेत.

एप्रिल महिन्यात झालेली गुंतवणूक योजनेचा प्रकार     झालेली गुंतवणूक (कोटी रुपये) ओपन एण्डेड इन्कम /डेट योजना         १,००,९०३.४८ ग्रोथ/इक्विटी योजना         ३४३७.३७ हायब्रिड योजना         ८६४१.३२ विशिष्ट हेतू योजना         ५८.०६ अन्य योजना         ५०७९.४४ एकूण         १,१८,११९.९६

टॅग्स :निधी