लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : घर खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या सुमारे अर्ध्या लोकांना असे वाटते की, बांधकाम खर्च वाढल्यामुळे येणाऱ्या ६ महिन्यांत घरांच्या किमती वाढू शकतात. घर खरेदी करताना किमतीत सूट मिळावी व हप्ते भरण्यासाठी लवचिक योजना असावी, अशी अपेक्षा ७३ टक्के इच्छुक खरेदीदारांनी व्यक्त केली आहे.
अहवालानुसार, ४७ टक्के जण शेअर, सोने आणि मुदत ठेवींऐवजी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू इच्छितात. वर्ष २०२० च्या दुसऱ्या सहामाहीत हे प्रमाण केवळ ३५ टक्के होते. ‘हाउसिंग डॉट कॉम’ आणि रिअल इस्टेट संघटना ‘नारेडको’ यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे प्रत्येक व्यक्तीची घराची गरज वाढली आहे. आता लोक मोठे आणि अधिक चांगले घर घेऊ इच्छितात. आमच्या आकड्यांनुसार, वर्ष २०२१ मध्ये घरांची विक्री १३ टक्क्यांनी वाढली आहे. २०२२ मध्ये घरांची विक्री कोविडपूर्व स्तरावर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सरकारने गृहकर्जाच्या व्याजावरील कर सवलत वाढवायला हवी तसेच बांधकाम साहित्यावरील जीएसटी दरांत कपात करायला हवी, अशी सूचना अहवालात करण्यात आली आहे.
१ तारखेपासून घरांच्या किमती वाढणार
गेल्या ४५ दिवसांमध्ये घर बांधणीच्या खर्चात २० ते २५ टक्क्यांची वाढ झाल्याने घरांच्या किमतीत पुढील महिन्यापासून १० ते १५ टक्के वाढ होण्याचा अंदाच क्रेडाईने व्यक्त केला आहे. अहवालानुसार, ५१ टक्के लोकांना वाटते की, आगामी ६ महिन्यांत घरांच्या किमती वाढू शकतात. ७३ टक्के लोकांना घरांच्या किमतीत सूट आणि हप्त्यांसाठी लवचिक योजनेची अपेक्षा आहे.