Join us  

सलग तिसऱ्या सप्ताहात निर्देशांकांची वाढती कमान

By admin | Published: August 15, 2016 6:56 AM

बाजाराला सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या चांगल्या खरेदीने तारल्यामुळेच सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये बाजार वाढीव पातळीवर बंद होऊ शकला.

भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या पतधोरणाने निराश झालेल्या बाजाराला सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या चांगल्या खरेदीने तारल्यामुळेच सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये बाजार वाढीव पातळीवर बंद होऊ शकला. जगभरातील बाजारांमध्ये असलेल्या तेजीचा मिळालेला फायदा, विविध आस्थापनांचे जाहीर झालेले अपेक्षेनुरूप निकाल आणि हवामान विभागाचा चांगल्या पावसाचा अंदाज, यामुळे बाजाराचा हुरूप वाढलेला दिसून आला.सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये बाजारात मरगळ असल्यामुळे निर्देशांक घसरले होते. मात्र, सप्ताहाच्या उत्तरार्धात जगभरातील बाजारांमध्ये आलेल्या तेजीचा मिळालेला फायदा आणि परकीय वित्तसंस्थांची मोठी खरेदी, यामुळे बाजार वाढला आणि सप्ताहाच्या प्रारंभीची सगळी भर निघाली. सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २८१५२.४० अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ७४.०५ अंश म्हणजेच १.०५ टक्क््यांनी वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ११ अंशांनी वाढून ८६७२.१५ अंशांवर बंद झाला.सप्ताहाच्या प्रारंभीच भारतीय रिझर्व्ह बँकेने तिमाही पतधोरण जाहीर केले. या पतधोरणात सर्व दर कायम राखतानाच, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज ७.६ टक्केच दाखविल्याने बाजारात मरगळ आली. त्यातच भारताच्या सार्वजनिक क्षेत्रामधील बॅँकांकडील अनुत्पादक मालमत्ता वाढल्याचे जाहीर झाले. २०१३-१४ मध्ये २.१६ लाख कोटींवर असलेली ही मालमत्ता मार्च २०१६ अखेर ४.७६ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात मोठी विक्री झाली आणि निर्देशांक घसरले. लोकसभेने जीएसटी विधेयकाला मंजुरी दिल्याने, येत्या एप्रिलपासून जीएसटी लागू होणार आहे. मात्र, त्याचा बाजारावर फारसा परिणाम झालेला दिसून आला नाही.सप्ताहाच्या उत्तरार्धात अमेरिकेने कमी राखलेले व्याजदर, युरोपियन युनियनसह अन्य अर्थव्यवस्थांकडून मंदीत असलेल्यांसाठी काही प्रोत्साहन योजना जाहीर होण्याची शक्यता व्यक्त झाली. यामुळे जगभरातील बाजारांमध्ये तेजी दिसून आली. त्याचा फायदा भारतीय बाजारालाही मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाच्या दरामध्ये झालेली वाढ आणि चीनमधील मंदीचा फायदाही बाजाराला झाला. चीनमधील मंदीमुळे युरोपियन वित्तसंस्थांची गुंतवणुकीसाठी भारताला अधिक पसंती मिळू लागली आहे. परिणामी, गुंतवणूक वाढती आहे. परकीय वित्तसंस्थांनी मोठी खरेदी करून बाजाराच्या वाढीला हातभार लावला.हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली, याचाही बाजारावर चांगला परिणाम झाला. >आठवड्यातील घडामोडीभारतीय रिझर्व्ह बॅँकेने ठेवले सर्वच दर कायम यंदा सरासरीच्या १५ टक्के अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज तळा जगभरातील शेअर बाजारांमधील तेजीचा भारताला फायदाचीनच्या अर्थव्यवस्थेला मंदीच्या ड्रॅगनचा घट्ट विळखाविविध आस्थापनांचे समाधानकारक निकालजीएसटी मंजुरीमुळे आशा>परकीय वित्तसंस्थांनी मोठी खरेदी करून बाजाराच्या वाढीला हातभार लावला आहे.