नवी दिल्ली - देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर इंधन कंपन्यांनी दररोज होत असलेला दरातील बदल थांबविला होता. त्यानंतर 82 दिवसांनंतर 7 जूनपासून कंपन्यांनी इंधनाचे दर दररोज जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. गेल्या नऊ दिवसांत झालेल्या दरवाढीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे, काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे.
देशात अनलॉक प्रकिया सुरु झाल्यानतर इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. गेल्या ९ दिवसांत पेट्रोलच्या दरात लिटरमागे ५ रुपयांची वाढ झाली असून डिझेलचे दर लिटरला 4.87 रुपये इतके वाढले आहेत. विशेष म्हणजे देशात इंधन दरवाढीचा भडका उडणार असून आणखी काही दिवस पेट्रोल-डिझेल महागणार असल्याची माहिती मिळत आहे. या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने ठोस भूमिका घेत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ तात्काळ थांबवून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणीच सोनिया गांधीनी या पत्राद्वारे केली आहे. लॉकडाउन अन् कोरोना महामारीच्या संकटात सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवणे हे असंवेदनशील असल्याचं सोनिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल-डिझेलच्या किमती या आणखी 2 आठवडे रोज वाढत राहतील. इंधनाच्या किरकोळ किंमतीमध्ये 8 रुपयांपर्यंतची वाढ करून लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई केली जावी अशी तेल कंपन्यांची योजना राहील. तेल कंपन्यांनी 16 मार्च नंतर 83 दिवसांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतही वाढ केली नव्हती. लॉकडाऊनमध्ये राज्यांनी व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) मध्ये वाढ केल्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या होत्या. त्यावेळी तेल कंपन्यांनी कोणती वाढ केली नव्हती.