शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीहवामान खात्याने व्यक्त केलेला पावसाचा नवीन अंदाज, विविध आस्थापनांचे जाहीर झालेले आशादायक निकाल, परकीय वित्तसंस्थांकडून झालेली खरेदी अशा विविध कारणांमुळे गतसप्ताहात बाजार तेजीत राहिला. सप्ताहादरम्यान बाजाराच्या संवेदनशील आणि निफ्टी या निर्देशांकानी नवीन उच्चांकांची नोंद केली. जागतिक बाजारांमध्ये असलेल्या मरगळीचा भारतीय बाजारावर परिणाम दिसून आला नाही. मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह हा अखेरचा दिवस सोडला तर तेजीचाच राहिला. बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने या दरम्यान ३०३६६.४३ अशी सर्वाधिक उच्चांकी झेप घेतली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक मागील बंद निर्देशांकापेक्षा ३२९.३५ अंशांनी वाढून ३०१८८.१५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही (निफ्टी) सप्ताहादरम्यान नवीन उच्चांकाची नोंद केली आहे. या सप्ताहामध्ये ९४५०.६५ अशी नवीन उच्चांकी झेप या निर्देशांकाने घेतली. सप्ताहाच्या अखेरीस तो थोडासा खाली येऊन ९४००.९० अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ११५.६० अंशांची वाढ झाली. स्मॉलकॅप आणि मिडकॅप या निर्देशांकांमध्येही वाढ झालेली दिसून आली. गतसप्ताहामध्ये विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्था पुन्हा खरेदीला उतरल्यामुळे बाजारात तेजी परतली. त्यातच काही आस्थापनांचे जाहीर झालेले निकाल चांगले आल्याने बाजाराने चांगला प्रतिसाद दिला. भारतीय हवामान खात्याने यंदा पाऊस चांगला होणार असल्याचा जाहीर केलेला सुधारित अंदाज दिला. यामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या अपेक्षेने बाजार चढला. अखेरच्या दिवशी नफा कमविण्यासाठी मात्र विक्री झाली.जगभरातील शेअर बाजारांमध्ये अमेरिकन अध्यक्षांनी एफबीआय प्रमुखांना हटविल्याने चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे तेथील निर्देशांक खाली आलेले दिसून आले. मात्र याचा परिणाम भारतात जाणवला नाही.
निर्देशांकांचे नवीन उच्चांक गाठणे सुरूच
By admin | Published: May 15, 2017 12:27 AM