Join us

निर्देशांकांचे नवनवीन उच्चांक गाठणे सुरूच

By admin | Published: June 05, 2017 12:25 AM

बाजाराच्या संवेदनशील आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठणे सुरूच ठेवले

प्रसाद गो. जोशीबाजाराच्या संवेदनशील आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठणे सुरूच ठेवले असून सलग चौथ्या सप्ताहामध्ये बाजार वाढीसह बंद झाला. बाजारात सुरू असलेली जोरदार खरेदी, रिझर्व्ह बॅँकेकडून व्याजदर कपातीचे टॉनिक मिळण्याची आशा, खनिज तेलाच्या कमी होत असलेल्या किमती यामुळे देशाच्या आर्थिक आकडेवारीतील घटही बाजाराने नजरेआड केली. परकीय वित्तसंस्थांनी मात्र विक्रीचा मार्ग पत्करलेला दिसून आला.मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहाच्या प्रारंभी काहीसा खाली येऊन सुरू झाला. त्यानंतर नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीचाही त्याला फटका बसला. मात्र नंतर या निर्देशांकातील महत्त्वाच्या समभागांमध्ये मोठी खरेदी झाल्याने चांगली वाढ होऊन ३१३३२.५६ अशी नवीन उच्चांकी पातळीही गाठून आला. सप्ताहाच्या अखेरीस तो २४५.०८ अंशांनी वाढून ३१२७३.२९ असा नवीन उच्चांकी बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ५८.४० अंश म्हणजे ०.६१ टक्क्यांची वाढ नोंदवून ९६५३.५० अंशांवर बंद झाला. तत्पूर्वी या निर्देशांकाने ९६७३.५० अशा नवीन उच्चांकापर्यंत मजल मारली होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये या आठवड्यात अनुक्रमे १.९४ आणि १.४९ टक्क्यांनी वाढ होऊन ते १४८०१.४८ आणि १५३११.१७ अंशांवर बंद झाले.बाजारामध्ये गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्था तसेच पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी विक्री करून नफा कमविण्याचे धोरण स्वीकारले. सप्ताहामध्ये त्यांनी ३५७.४७ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. देशांतर्गत वित्तीय संस्था तसेच गुंतवणूकदारांनी मात्र जोरदार खरेदी केली.जानेवारी ते मार्च या तिमाहीतील देशांतर्गत एकूण उत्पादनामध्ये घट झाल्याने जीडीपी कमी झाला. देशात असलेले स्थैर्य, जीएसटी लागू होण्याची शक्यता आणि पावसाची वाटचाल यामुळे गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले दिसून आले.पाच आस्थापनांच्या बाजारमूल्यात वाढभांडवल बाजारातील पाच प्रमुख आस्थापनांच्या बाजारमूल्यामध्ये नुकत्याच संपलेल्या सप्ताहाच्या अखेरीस ३७ हजार २१४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. १२ हजार ७५४.७५ कोटी रुपयांची वाढ नोंदवून आयटीसी ही आस्थापना वाढीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.हिंदुस्थान युनिलीव्हर (१० हजार २२ कोटी), एचडीएफसी (९९७१ कोटी), एचडीएफसी बॅँक (३२३० कोटी) आणि मारुती सुझुकी (१२३५ कोटी ) या अन्य आस्थापनांच्या बाजार भांडवलामध्येही मोठी वाढ झाली आहे.बाजारमूल्यामध्ये टीसीएस सर्वात अव्वल स्थानी आहे. हिंदुस्थान युनिलीव्हरने नवव्यावरून सहाव्या स्थानी मजल मारून तीन स्थानांनी वरची पायरी गाठली आहे.या कालावधीमध्ये इन्फोसिस, रिलायन्स, टीसीएस, ओएनजीसी आणि स्टेट बॅँक यांच्या बाजारमूल्यामध्ये घट झाली आहे.