प्रसाद गो. जोशी
कोरोनाचा नवा विषाणू (ओमायक्रॉन) हा अपेक्षेपेक्षा कमी धोकादायक असल्याच्या निर्वाळ्यानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये काहीशी वाढ दिसून आली. रिझर्व्ह बँकेने कायम ठेवलेले दर आणि काही प्रमाणात झालेली खरेदी यामुळे भारतामध्येही बाजार वाढीव पातळीवर बंद झाले.
सप्ताहाचा प्रारंभ वाढीने करणाऱ्या बाजाराला नंतर मात्र विक्रीचा तडाखा बसून बाजार खाली आला. परकीय वित्तसंस्थांनी विक्रीचा मारा कायम राखला आहे. असे असले तरी सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक वाढले. यामुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेमध्ये ६.६६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी उशिराने जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादनावरील बाजाराची प्रतिक्रिया आज समजेल.
‘रिअल्टी’ ने ओलांडला चार हजार अंशांचा टप्पा
मुंबई शेअर बाजाराचा क्षेत्रीय निर्देशांक असलेल्या रिअल्टी या निर्देशांकाने शुक्रवारी प्रथमच चार हजार अंशांचा टप्पा ओलांडला आहे. बाजाराच्या क्षेत्रीय निर्देेशांकांचा विचार करता हा निर्देशांक सप्ताहामध्ये ५.४ टक्क्यांची वाढ नोंदवीत अव्वल ठरला आहे. यापाठोपाठ धातू आणि भांडवली वस्तूंचे निर्देशांक वाढले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग चांगले वाढत असलेले दिसून आले आहे. त्यामुळेच रिअल्टी निर्देशांक चार हजारांचा टप्पा ओलांडू शकला.
गतसप्ताहामध्येही परकीय वित्तसंस्थांकडून विक्री सुरूच होती. सप्ताहामध्ये या संस्थांनी ९,२०३.४७ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. देशांतर्गत वित्तसंस्थांनी ७,२१२.३४ कोटी रुपयांची खरेदी केली. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत परकीय वित्तसंस्थांकडून १६,२३५.१९ कोटी रुपयांची विक्री झाली तर देशांतर्गत वित्तीय संस्थांची खरेदी १३,७००.८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ख्रिसमसमुळे गेल्या महिनाभरापासून परकीय वित्तसंस्था बाजारातील रक्कम काढून घेत आहे.
आगामी सप्ताहामध्ये बाजाराची वाटचाल ही मुख्यत: ओमायक्रॉनचा संसर्ग किती वाढतो, ते पाहूनच ठरणार आहे. त्याशिवाय नोव्हेंबर महिन्यातील चलनवाढ, पीएमआय याबाबतची आकडेवारी त्यावरच ठरेल.
‘ओमायक्रॉन’ची भीती घटल्याने निर्देशांकामध्ये वाढ
कोरोनाचा नवा विषाणू (ओमायक्रॉन) हा अपेक्षेपेक्षा कमी धोकादायक असल्याच्या निर्वाळ्यानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये काहीशी वाढ दिसून आली.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 08:38 AM2021-12-13T08:38:29+5:302021-12-13T08:38:48+5:30