भारतीय अर्थव्यवस्थेची होकारात्मक आकडेवारी, परकीय वित्तसंस्थांची खरेदी, झटपट नफा कमविण्यासाठी काही प्रमाणात झालेली विक्री या जोडीलाच आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक वातावरण यामुळे निर्देशांक सलग दुसऱ्या सप्ताहात वाढीव पातळी गाठत बंद झाले.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहामध्ये तेजीचे राज्य दिसून आले. बाजारात झालेल्या चार दिवसांच्या व्यवहारांपैकी तीन दिवस निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहामध्ये २६ हजार ८० ते २५,६३४ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो २५८३८.१४ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये २११.३९ अंश म्हणजेच ०.८२ टक्का वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ४८.५८ अंश (०.६२ टक्का) वाढून ७८९९.३० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ०.९४ आणि १.२४ टक्क्याने वाढ झाली आहे.
गतसप्ताहामध्ये बाजारातील वातावरण सकारात्मक राहिले. देशातील घाऊक बाजारातील किमती या मागील महिन्यापेक्षा कमी झाल्या. डाळी तसेच अन्य काही जिनसांच्या किमती वाढल्या असूनही ही घट झाली, हे विशेष होय. सलग १७ व्या महिन्यामध्ये घाऊक बाजारातील किमतींमध्ये घट दिसून आली. याचबरोबर देशाच्या आयात- निर्यात व्यवहारांमधील तफावतही कमी झाली आहे. देशाची निर्यात वाढतानाच आयातीमध्ये कपात झाल्याने या व्यवहारांमध्ये काही प्रमाणात संतुलन येऊन अर्थव्यवस्था मजबुतीकडे झुकत असलेली दिसून येत आहे. या जोडीलाच परकीय वित्तसंस्थांची भारतीय शेअर बाजारातील खरेदी कायम आहे. गतसप्ताहामध्ये या संस्थांनी २१६३.८७ कोटी रुपयांची खरेदी केली. यामुळे बाजाराच्या वाढीला हातभार लागला आहे. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमधील वातावरणही गतसप्ताहामध्ये सकारात्मक राहिले. युरोपियन सेंट्रल बॅँकेने व्याजदरामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय जाहीर केला. या जोडीलाच जपानचे चलन येनच्या दरामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरण झाली. यामुळे जपानच्या निक्की या निर्देशांकामध्ये सुमारे साडेअकरा महिन्यांमधील सर्वाधिक वाढ झाली.
आगामी काळामध्ये भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून व्याजदरामध्ये आणखी कपात होण्याची अपेक्षा असल्यामुळे बॅँकांच्या समभागांमध्ये तेजी असलेली दिसून आली.
याशिवाय पुढील सप्ताहामध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक होत आहे. संसदेचे सुरू होणारे अधिवेशन आणि एप्रिल महिन्याची सौदापूर्ती यामुळे बाजारातील उलाढाल ठरणार असून, त्यावरही बाजाराचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.
>आठवड्यातील घडामोडी
सलग तिसऱ्या महिन्यात भारताच्या आयात-निर्यात व्यापारातील तफावत झाली कमी.
युरोपियन सेंट्रल बॅँकेकडून व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही.
मार्च महिन्यात देशातील घाऊक बाजारातील किमती कमी, सलग १७ व्या महिन्यात झाली घट.
आशियामध्ये खनिज तेलाच्या दरांमध्ये झाली वाढ.
परकीय वित्तसंस्थांकडून खरेदी.
नफ्यासाठीच्या विक्रीनंतरही निर्देशांक वधारले
झटपट नफा कमविण्यासाठी काही प्रमाणात झालेली विक्री या जोडीलाच आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक वातावरण यामुळे निर्देशांक सलग दुसऱ्या सप्ताहात वाढीव पातळी गाठत बंद झाले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 04:12 AM2016-04-25T04:12:11+5:302016-04-25T04:12:11+5:30