सप्ताहाच्या प्रारंभी मोठ्या प्रमाणावरील विक्रीच्या दबावामुळे कमी झालेल्या निर्देशांकाने उत्तरार्धामध्ये चांगली उसळी घेतल्याने बाजाराने सलग तिसऱ्या सप्ताहात वाढीव पातळीवर बंद झाला. सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांकाने २७ हजार तर निफ्टीने ८२०० अंशांची पातळी राखल्याने समाधानाचे वातावरण आहे.
मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहात प्रारंभी मंदीचे वातावरण राहिले. सप्ताहातील पाच सत्रांपैकी पहिल्या तीन सत्रांमध्ये बाजार घसरला. याच कालावधीत निर्देशांक २७ हजार अंशांच्या खाली आला. मात्र नंतरच्या दोन सत्रांमध्ये बाजारात खरेदीदार मोठ्या प्रमाणावर उतरल्यामुळे आधीची मंदी गडप होऊन निर्देशांक पुन्हा २७ हजारांवर पोहोचला. सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक १३५.०९ अंशांनी वाढून २७२१४.६० अंशांवर बंद झाला. निर्देशांकाच्या वाढीचा हा सलग तिसरा सप्ताह राहिला. या काळामध्ये निर्देशांकात १३५१.१० अंश म्हणजेच ५.२२ टक्कयांनी वाढ झाली. निर्देशांकातील ३० पैकी २३ समभागांमध्ये वाढ जालेली दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ४८.८५ अंश म्हणजेच ०.५० टक्के काढून ८२३८.१५ अंशांवर बंद झाला.
गतसप्ताहाच्या प्रारंभीच चीन तसेच अमेरिका आणि युरोपच्या आर्थिक वृद्धीची आकडेवारी जाहीर झाली. ही आकडेवारी फारशी उत्साहवर्धक नसल्याने त्याचा बाजारावर विपरित परिणाम झाला. त्यानंतर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह एवढ्यात व्याजदर वाढविणार नसल्याचे जाहीर झाल्यानंतर परकीय वित्तसंस्था भारतीय बाजारामध्ये खरेदीसाठी उतरल्या आणि बाजार तेजीमध्ये आला. चालू महिन्यात परकीय वित्तसंस्थांनी ४१० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे.
जगभरामध्ये असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर भारताची निर्यात घटली आहे. गतसप्ताहामध्ये जाहीर झालेली आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे. भारताची निर्यात ही तीन वर्षांमधील सर्वात कमी झाली आहे. याचा मोठा फटका बसत आहे तो औद्योगिक उत्पादन करणाऱ्या आस्थापनांना. असे असूनही माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आस्थापना आपला दबदबा कायम राखून असल्याने निर्यात बरी आहे. विविध आस्थापनांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होत आहेत. अद्याप या निकालांनी बाजाराला अपेक्षित प्रभाव दाखविलेला नाही.
सलग तिसऱ्या सप्ताहात निर्देशांक वाढले
सप्ताहाच्या प्रारंभी मोठ्या प्रमाणावरील विक्रीच्या दबावामुळे कमी झालेल्या निर्देशांकाने उत्तरार्धामध्ये चांगली उसळी घेतल्याने बाजाराने सलग तिसऱ्या सप्ताहात वाढीव पातळीवर बंद झाला
By admin | Published: October 18, 2015 10:57 PM2015-10-18T22:57:27+5:302015-10-18T22:57:58+5:30