-प्रसाद गो. जोशी
सातत्याने वाढत असलेल्या खनिज तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठलेला सार्वकालीन नीचांक, परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेला विक्रीचा मारा आणि नकारात्मक आंतरराष्टÑीय वातावरण अशा विविध कारणांनी गतसप्ताहामध्ये शेअर बाजारात निराशाच राहिली. मुंबई तसेच राष्टÑीय शेअर बाजारांचे निर्देशांक लाल रंगात बंद झालेले दिसून आले. गेल्या चार महिन्यांमध्ये निर्देशांक घसरतानाच दिसत आहेत.मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३५,७८३.७५ अंशांवर खुला झाला. त्यानंतर सप्ताहामध्ये तो ३५,८०६.९७ ते ३४,९३७.१५ अंशांदरम्यान हेलकावत राहिला. सप्ताहाच्या अखेरीस तो ३५,४२३.४८ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये २६६.१२ अंशांनी घसरण झाली. सलग चौथ्या महिन्यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घट झालेली दिसून आली.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १०७.५५ अंशांनी खाली येऊन १०,७१४.३० अंशांवर बंद झाला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांकही सातत्याने घसरत असलेले दिसून आले. मिडकॅप निर्देशांकामध्ये ३८८.७१ अंशांची घट होऊन तो १५,४५०.९० अंशांवर बंद झाला, तर स्मॉलकॅपमध्ये ५०७.६९ अंशांची घसरण झाली. सप्ताहाच्या अखेरीस तो १६,०३२.१५ अंशांवर बंद झाला.गतसप्ताहात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया अचानक गडगडला आणि त्याने आतापर्यंतची नीचांकी पातळी (६९.०९) गाठली. यामुळे बाजारालाही काही धक्के बसू लागले. खनिज तेलाच्या आयातीसाठी अधिक परकीय चलन लागत असल्यामुळे परकीय चलनाच्या गंगाजळीमध्येही घट झालेली दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस देशांतर्गत वित्तसंस्थांनी केलेल्या मोठ्या खरेदीमुळे निर्देशांक वाढला आणि साप्ताहिक घट काही प्रमाणात कमी झाली. सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी १.५७ अब्ज रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी बाजारात २२.६ अब्ज रुपये ओतले.तीन महिन्यांमध्ये एफपीआयकडून मोठी विक्री- चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवल बाजारामध्ये ३.०२ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीच्या समभागांची विक्री केली आहे. जानेवारी २०१७ नंतर कोणत्याही तिमाहीतील ही सर्वाेच्च विक्री आहे.- खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर येणारा ताण, वाढत असलेली चलनवाढ, रुपयाचे घसरणारे मूल्य आणि पाश्चिमात्य देशांमध्ये व्याजदर वाढण्याची निर्माण झालेली शक्यता या कारणांमुळे गेल्या तीन महिन्यांपासून एफपीआय सातत्याने विक्री करीत आहे.- सर्वच उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये या संस्थांकडून विक्री केली जात आहे. भारतामध्ये त्यांची गुंतवणूक मोठी असल्याने साहजिकच विक्रीही जास्त आहे. इंडोनेशिया (१.८५ अब्ज डॉलर), दक्षिण कोरिया (२.६ अब्ज डॉलर), तैवान (६.५ अब्ज डॉलर) येथेही मोठी विक्री झाली आहे.