INDIA alliance meeting: विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी 28 विरोधी पक्षांचे प्रमुख नेते मुंबईत हजर झाले आहेत. या बैठकीत जागावाटपासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक मुंबईतील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये होत असून, यासाठी हॉटेलमध्ये सुमारे 200 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या हॉटेलमध्ये राहण्याचे भाडे किती, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग जाणून घेऊ...
ग्रँड हयात हॉटेल वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. 10 एकरात पसरलेले हे हॉटेल 2004 मध्ये सुरू झाले होते. तेव्हापासून हे हॉटेल उद्योजग, परदेशी पर्यटक आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. याचे डिझाइन शिकागोस्थित कंपनी लोहान असोसिएट्सने तयार केले आहे. या हॉटेलमध्ये 548 खोल्या आणि सर्व्हिस अपार्टमेंट आहेत. हॉटेलमध्ये चार रेस्टॉरंट्स (सोमा, 55 ईस्ट, सेलिनी आणि चायना हाऊस) आहेत. दरम्यान, हॉटेलने सर्व नेत्यांना विमानतळावरुन आणण्यासाठी खास लिमोझिनची व्यवस्था केली आहे.
एका रुमचे भाडे किती?या हॉटेलमध्ये अनेक स्वीट, खोल्या आणि अपार्टमेंट उपलब्ध आहेत. स्वीट्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, हॉटेलमध्ये डिप्लोमॅटिक स्वीट, ग्रँड एक्झिक्युटिव्ह स्वीट, ग्रँड स्वीट किंग, प्रेसिडेंशियल स्वीट, व्हरांडा स्वीट किंग यांचा समावेश आहे. डिप्लोमॅटिक सूटमध्ये एका दिवसाचे भाडे 40,710 रुपये आहे. हॉटेलमधील प्रेसिडेन्शिअल स्वीटमध्ये रात्रीचे भाडे शुल्कासह 352,820 रुपये आहे. याशिवाय, यामध्ये 12 वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या आणि आठ प्रकारच्या अपार्टमेंटचा समावेश आहे. यामध्ये एका दिवसाचे खोली भाडे करासह 12,980 ते 17,110 पर्यंत आहे.