लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पूर्वी चीनकडून अमेरिकेला मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनची निर्यात केली जात असे परंतु आता तीच जागा हळूहळू भारत घेऊ लागला आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या काळात भारताने अमेरिकेला ३.५२ अब्ज डॉलर्स इतके मूल्य असलेल्या स्मार्टफोनची निर्यात केली आहे. २०२२-२३ या वर्षात याच कालावधीत अमेरिकेला ९९.८ कोटी डॉलर्सच्या फोनची निर्यात केली होती, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली.
देशात विविध ठिकाणी स्मार्टफोन निर्मितीचे प्रकल्प सुरु झाल्याने भारतात स्मार्टफोनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे स्मार्टफोनच्या निर्यातीला चालना मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे भारत आता अमेरिकेचा तिसरा सर्वांत मोठा निर्यातदार देश बनला आहे. निर्यातदारांमध्ये पहिल्या स्थानी चीन तर दुसऱ्या स्थानी व्हिएतनाम हे देश आहेत. असे असले चालू आर्थिक वर्षात अमेरिकेला होत असलेल्या स्मार्टफोनच्या निर्यातीत या दोन देशांचा वाटा घटला आहे.
चीन आणि व्हिएतनामचा निर्यातीचा टक्का घसरला
देश २०२२ २०२३
इतर पाच देश ४९.१ ४५.१ चीन ३८.२६ ३५.१ व्हिएतनाम ९.३६ ५.४७(एप्रिल ते डिसेंबर या कालावधीतील आकडेवारी अब्ज डॉलर्समध्ये)
७.७६% - २०२३ मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत स्मार्टफोनचा वाटा ७.७६ टक्के इतका होता. गतवर्षी हे प्रमाण केवळ दाेन टक्के इतके होते.
मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारताचा प्रवेश
आयफोनचे डिझाइन अमेरिकेत तयार केले जाते. त्याचे उत्पादन चीन आणि भारतात होते. आठ वर्षांपूर्वीपर्यंत फोन निर्मितीवर चीनचे पूर्ण नियंत्रण होते. जगभरात विकले जाणारे बहुतेक फोन चीनमध्ये तयार होत असत. स्वस्त मजूर आणि कच्चा माल यांची उपलब्धता हे त्यामागचे प्रमुख कारण होते. त्यामुळेच चीन जगातील सर्वांत मोठे निर्यात केंद्र होते परंतु आता परिस्थिती बदलली आहे. स्मार्टफोन उत्पादन वाढवून भारताने निर्यातीत मोठी आघाडी घेतली आहे.