Join us  

भारतानं तांदळाच्या निर्यातीवर घातली बंदी; अमेरिकेतील दुकानदार म्हणाले, 'एका पॅकेटपेक्षा जास्त मिळणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 5:04 PM

अलीकडेच भारत सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली.

अलीकडेच भारत सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी (India Ban Rice Export) घातली. यानंतर अमेरिकेतील डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये तांदूळ खरेदीसाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. तांदूळ खरेदीसाठी एवढी गर्दी होती की दुकानांना तांदूळ खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना ठराविक मर्यादेतच तांदूळ देण्याचा निर्णय घ्यावा लागला. अनेक दुकानांमध्ये परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी 'प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एक तांदळाची पोतं' अशी नोटीस लावण्यात आली आहे. मात्र तांदळाच्या साठ्याबाबत आता अमेरिकेत चिंता निर्माण झालीये.

लोक तांदूळ साठवण्याचा प्रयत्न करतील आणि नंतर ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे जास्त किमतीत विकतील अशी भीती त्या ठिकाणी वाढली आहे. भारतानं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे जागतिक स्तरावर विशेषत: परदेशात राहणाऱ्या भारतीयांवर परिणाम झाल्याचं म्हटलं जातंय.

खरेदीसाठी रांगापरदेशात राहणाऱ्या भारतीयांनी ट्विटरच्या माध्यमातून भारताच्या तांदळाच्या निर्यातीवर बंदीचा परिणाम दाखवण्याचा प्रयत्न केला. किराणा दुकानातील गर्दी आणि घाईघाईत खरेदी करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ त्यांनी शेअर केले. अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी तांदळाच्या उपलब्धतेबद्दल काळजी करण्याची गरज नाही. अमेरिकेत पुरेसा साठा आहे आणि तो सहा महिने टिकेल, अशी प्रतिक्रिया यावर प्रमुख तांदूळ निर्यातदार डेक्कन ग्रेन्स इंडियाचे संचालक किरण कुमार पोला यांनी दिली.

किंमत दुप्पटभारतातून निर्यात होणाऱ्या तांदळाचा अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वापर होत असून भारताच्या तांदूळ निर्यात बंदीच्या निर्णयामुळे तेथे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुकानांवर होणारी ही गर्दी पाहता अनेक ठिकाणी मोठ्या आणि मनमानी दराने तांदूळ विकला जात असल्याचंही सांगण्यात येत आहे. तांदळाच्या 9.07 किलोच्या बॅगची किंमत पूर्वी सुमारे 16 ते18 डॉलर्स होती. ती आता दुप्पट झाली आहे आणि काही ठिकाणी किंमत 50 डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.

टॅग्स :अमेरिकाभारत