नवी दिल्लीजगात सहाव्या स्थानी असलेली भारतीय अर्थव्यवस्था २०२५ सालापर्यंत यूकेच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून पाचवं स्थान पटकावेल आणि २०३० सालापर्यंत अशीच प्रगती करत तिसऱ्या स्थानी पोहोचेल, असा अहवाल समोर आला आहे.
भारताने २०१९ साली यूकेला मागे टाकत अर्थव्यवस्थेत पाचवं स्थान प्राप्त केलं होतं. पण २०२० साली भारताला सहावं स्थान मिळालं आहे.
"भारताला कोविड महामारीचा फटका बसला आहे हे खरं आहे. यूकेनं भारतीय अर्थव्यवस्थेला मागे टाकत यावेळी पुन्हा एकदा पाचवं स्थान प्राप्त केलं. पण भारतीय अर्थव्यवस्थेची क्षमता पाहता २०२५ पर्यंत पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्था यूकेला मागे टाकून पाचवं स्थान प्राप्त करेल", अशी माहिती अर्थशास्त्र आणि व्यवसाय संशोधन केंद्राने (सीइबीआर) आपल्या वार्षिक अहवालात नमूद केली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्याने यूकेच्या अर्थव्यवस्थेने भारताला मागे टाकत पाचवं स्थान प्राप्त केल्याचं या अहवालात म्हटलं आहे. याशिवाय, २०२१ साली भारताच्या अर्थव्यवस्थेत ९ टक्क्यांची, तर २०२२ साली ७ टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. "भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची चांगली क्षमता आहे. अर्थात ही वाढ धीम्या पद्धतीनं होत असली तरी २०२५ पर्यंत यूके, २०२७ साली जर्मनी आणि २०३० साली जपानला मागे टाकून भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होईल", असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
यूकेस्थित या संस्थेनं २०२८ पर्यंत चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला मागे टाकून जागतिक महासत्ता झालेली असेलं, असंही म्हटलं आहे. अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी चीनला लागणारा अपेक्षित कालावधी आता कोरोनामुळे पाच वर्षांनी कमी झाला आहे. कारण कोरोना महामारीत दोन्ही देशांची तुलना केल्यास अमेरिकेला चीनपेक्षा सर्वाधिक फटका बसला आहे.
दुसरीकडे जपानची अर्थव्यवस्था जोवर भारताची अर्थव्यवस्था आव्हान देत नाही तोवर तिसऱ्या स्थानावर कायम राहील. २०३० नंतर भारताने जपानलाही मागे टाकलेलं असेल, असं महत्वपूर्ण निरीक्षण 'सीईबीआर'च्या अहवालात नोंदविण्यात आलं आहे.