Join us

तेल रशियाचे, फायदा भारताला; दररोज होतेय २.२२ कोटी डॉलर्सची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 11:57 AM

रशिया-युक्रेन वादानंतर अमेरिकन देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांचा भारताला मोठा फायदा होत आहे. 

रशिया-युक्रेन वादानंतर अमेरिकन देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांचा भारताला मोठा फायदा होत आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाच्या पेट्रोलियम पदार्थांसह अनेक वस्तूंची खरेदी बंद केली असताना भारत आणि चीनने मात्र रशियाकडून खरेदीला प्राधान्य दिले आहे. याचा मोठा फायदा भारताला होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरात कपात करण्याची मागणी होत आहे. मार्च ते मे दरम्यान भारताने रशियाकडून ३.५ अब्ज डॉलर किमतीचे कच्चे तेल खरेदी केले, जे गेल्यावर्षीच्या तुलनेत पाचपट जास्त आहे. त्याचवेळी चीनने १५.७ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचे तेल खरेदी केले. जे गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. 

रशिया भारताला कच्च्या तेलाची स्वस्त दरात विक्री करत आहे. रशियातून दररोज ७.४ लाख बॅरल कच्चे तेल देशात येत आहे. भारताला प्रति बॅरल ३० डॉलरची सूट मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षात सूट किती आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. प्रति बॅरल ३० डॉलरची ही सूट योग्य मानली, तर भारत दररोज सुमारे २.२२ कोटी डॉलर्सची बचत करत आहे.

अमेरिकेसह अनेक देशांना फटकाआतापर्यंत भारत अमेरिकेकडूनही कच्चे तेल आयात करत असे. अमेरिकेचा इतर देशांमध्येही तेलाचा मोठा व्यवसाय आहे. अशा परिस्थितीत रशियावर अवलंबित्व दाखवून भारताने अमेरिकेच्या व्यापारी बाजारपेठेवरही संकट निर्माण केले आहे. भारत आणि रशिया डॉलरच्या तुलनेत रुबल आणि रुपयामध्ये आपला व्यवसाय करत आहेत. हे देखील आगामी काळात अमेरिकेसाठी अडचणीचे ठरू शकते.

कच्चे तेल स्वस्त झाल्याचा भारताला काय फायदा?

  • कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती ३ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
  • तांबे २०, तर ॲल्युमिनियमच्या किमती एक महिन्यातील सर्वांत स्वस्त
  • चांदी, सोन्याची किंमत ०२ वर्षांच्या नीचांकी स्तरावर

खर्च किती? भारताने २४ फेब्रुवारी ते ३० जून या कालावधीत रशियाकडून पेट्रोलियम आणि कोळसा आयातीवर ८.८ अब्ज डॉलर खर्च केले आहेत, जे २०२१ मध्ये रशियाकडून एकूण आयातीच्या समान आहे.

केंद्र सरकारने खाद्यतेल कंपन्यांना खाद्यतेलाचे दर कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर मदर डेअरीसह रुची सोया कंपनीने तेलाच्या किमतीत १० ते १५ रुपयांनी घट केली आहे. मदर डेअरीच्या १९४ रुपये प्रति लिटर खाद्यतेलाची किंमत १८० रुपये इतकी होईल. मात्र, असे करूनही खाद्यतेल महागच राहणार आहे. 

२०१७ च्या दरम्यान खाद्यतेलाच्या किमती ७६ रुपये ते १२० रुपयांदरम्यान होत्या. सध्या किमती प्रचंड वाढल्याने त्याचा ग्राहकांना फटका बसत आहे.

टॅग्स :भारतरशियाखनिज तेल