Join us  

भारताने घेतले ७२२ कोटींचे सोने, मे महिन्यात स्वित्झर्लंड, चीनकडून सर्वाधिक खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 5:58 AM

Gold News: मागील काही महिन्यांपासून जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करीत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयदेखील यात मागे नाही. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार भारताने मे महिन्यात तब्बल ७२२ कोटींचे सोने खरेदी केले आहे.

 नवी दिल्ली - मागील काही महिन्यांपासून जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करीत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयदेखील यात मागे नाही. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार भारताने मे महिन्यात तब्बल ७२२ कोटींचे सोने खरेदी केले आहे. भारताच्या तुलनेत स्वित्झर्लंड आणि चीनने अधिक प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे. 

मागील आर्थिक वर्षात भारताने आपल्या सोन्याच्या साठ्यात तब्बल २०४ टन सोन्याची भर घातली. मार्च २०१९ मध्ये देशाजवळील सोन्याचा साठा ६१८.२ टन इतका होता. ३१ मार्च २०२४ रोजी सोन्याच्या साठ्यात ३३ टक्के इतकी वाढ झाली असून सध्या साठा ८२२.१ टनांवर पोहोचला आहे. 

या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ८,५६१ रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एक जानेवारीला भाव ६३,३५२  रुपये इतका होता. हाच भाव आता  प्रतितोळा ७१,९१३ रुपयांवर पोहोचला आहे.

काही दिवसांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये ठेवलेले १०० टन सोने भारतात परत आणण्याचा निर्णय घेतला. आरबीआयने स्पष्ट केले की, यावरून कोणताही वेगळा अर्थ काढू नका. अलीकडे रिझर्व्ह बँक आपल्या राखीव निधीचा भाग म्हणून सोने खरेदी करीत आहे. या खरेदीचे प्रमाणही मोठे आहे. भारताकडे देशांतर्गंत सोने साठवण्याची क्षमता असल्यानेच बाहेरच्या देशात ठेवलेले सोने परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय वेळोवेळी सोने कोठे साठवायचे, याचा आढावा घेत असते. हे सोने मुंबई आणि नागपूर येथील मिंट रोड येथील आरबीआयच्या जुन्या कार्यालयात ठेवते. 

स्थैर्यासाठी सोने गरजेचे- देशाचे चलन आंतरराष्ट्रीय स्तरावर कमकुवत झाल्यास सोन्याचा साठा देशाची क्रयशक्ती आणि आर्थिक स्थिरता राखण्यास मदत करतो. - १९९१ मध्ये देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना वस्तू आयातीसाठी जवळ डॉलर्स नव्हते.  तेव्हा पैसे उभारण्यासाठी सोने गहाण ठेवले होते. - सोन्याचा साठा देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे दर्शवितो. इतर देश, जागतिक वित्तीय संस्था त्या देशावर अधिक विश्वास ठेवतात. 

टॅग्स :सोनंभारत