नवी दिल्ली - खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढतच चालला आहे. दोन्ही देशांमधील बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कॅनडाचा खरपूस समाचार घेतला. दोन्ही देशातील या तणावपूर्ण संबंधाचा व्यापारावरही परिणाम होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतातील महिंद्रा कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची सह्योगी कंपनी असलेल्या रेसनला कॉर्पोरेशनने कॅनडातील आपले कामकाज बंद केले आहे. रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून २० सप्टेंबर २०२३ रोजी ऑपरेशन्स बंद करण्याच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे मिळाली आहेत, ज्याची माहिती कंपनीला देण्यात आली आहे. त्यानंतर रेसनने आपले कामकाज बंद केले आणि ती यापुढे २० सप्टेंबर २०२३ पासून महिंद्रा कंपनीची सहयोगी कंपनी नसणार आहे. रेसन कॉर्पोरेशनची महिंद्रा कंपनीसोबत ११.१८ टक्के भागिदारी होती.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने शेअर मार्केटमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. कंपनीने कॅनडात उचललेल्या पावलानंतर देशांतर्गत बाजारात महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स आज गुरुवारी तीन टक्केपेक्षा जास्त घसरले आणि १,५८४.८५ रुपयांवर आले. तथापि, या वर्षी स्टॉकने YTD २५% आणि गेल्या एका वर्षात २१.२८% वाढ नोंदवली असून गेल्या पाच वर्षांत ६५% वाढ झाली आहे. रेसन कॉर्पोरेशनने स्वच्छेने कंपनीचं कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याचा परिणाम महिंद्रा कंपनीच्या शेअर मार्केटवर होत आहे.