नवी दिल्ली - सरकारच्या प्रोत्साहनामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात भारतातील प्रगती वेगाने होणार आहे. पुढील पाच वर्षांत भारत या बाजारात किंग बनू शकतो. यामुळे सेमिकंडक्टरमध्ये दबदबा असलेल्या चीन व अमेरिकेपुढे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
भारतातील सेमिकंडक्टर बाजार पाच वर्षांत १०३.४ अब्ज डॉलरपर्यंत (९० लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचणार आहे. इंडियन इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमिकंडक्टर असोसिएशन (आयईएसए) च्या ‘इंडिया सेमिकंडक्टर मार्केट रिपोर्ट २०२३’ मध्ये ही माहिती दिली आहे. या वाढत्या बाजारामुळे ४०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक्स बाजारालाही गती मिळेल. २०२४-२५ मध्ये देशातील सेमिकंडक्टरची विक्री ५२ अब्ज डॉलर होती.
सेमिकंडक्टर म्हणजे काय?
सेमिकंडक्टर म्हणजेच लहान इलेक्ट्रॉनिक चिप संगणक, मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरली जाते. भारतात या वस्तूंना मोठी मागणी असल्याने या क्षेत्रात होणारी गुंतवणूक आणि त्यातून मिळणाऱ्या रोजगारांमध्येही वाढ होणार आहे.
चीन, अमेरिकेची स्थिती कशी?
अमेरिकेचा सेमिकंडक्टर बाजार २०२३ मध्ये ६७ अब्ज डॉलरचा होता. तो २०२९ पर्यंत १३१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. चीनचा सेमीकंडक्टर बाजार २०२३ मध्ये १८० अब्ज डॉलरचा होता, जो २०२९ पर्यंत २८० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.
काय आहेत शिफारशी?
भारतात सेमिकंडक्टर उद्योगाच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी अहवालात काही शिफारशी केल्या आहेत. यामध्ये इंडिया सेमिकंडक्टर मिशनसाठी प्रारंभिक निधी १० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे. डीएलआय योजनेत काही बदल करण्याची सूचना केली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन पीएलआयअंतर्गत २०२५-२६ पर्यंत २५ टक्के आणि २०३० पर्यंत ४० टक्के स्थानिक उत्पादनाचा वापर करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. यामुळे उत्पादन व रोजगार संधीही वाढतील.
या क्षेत्रांमध्येही वाढ : ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. मोबाइल फोन, आयटी यातून सध्या सर्वाधिक म्हणजे ७०% उत्पन्न मिळते.