Join us  

भारत हा आकर्षक देश, पण काळ आव्हानात्मक

By admin | Published: January 11, 2017 12:39 AM

जगात जलदगतीने वृद्धी आणि सर्वांना आकर्षित करू शकेल, असा देश आहे. तथापि, सध्याचा काळ भारतासाठी अतिशय आव्हानात्मक आहे

न्यूयॉर्क : जगात जलदगतीने वृद्धी आणि सर्वांना आकर्षित करू शकेल, असा देश आहे. तथापि, सध्याचा काळ भारतासाठी अतिशय आव्हानात्मक आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य केले. भारताकडे आर्थिक महासत्ता बनण्याची पूर्ण क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले.४२ वर्षीय आचार्य यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यस्थेला प्रगती करण्यास मदत मिळत आहे. त्यात आपले योगदान देण्याची संधी मिळाल्यामुळे मी उत्साही आहे. रिझर्व्ह बँक भारतात वृद्धी स्थिर होण्याचे निश्चित करू शकते. आचार्य हे २0 जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. त्यांच्याकडे पतधोरण आणि संशोधन हे विभाग असतील. उर्जित पटेल यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.आचार्य हे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल आॅफ बिझनेसच्या वित्त विभागात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहे. र्स्टन स्कूलच्या वतीने एक निवेदन जारी करून आचार्य यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. रघुराम राजन यांच्या प्रमाणेच आचार्य हेही शैक्षणिक क्षेत्रातून रिझर्व्ह बँकेवर आले आहेत. विशेष म्हणजे आचार्य आणि रघुराम राजन यांनी एकत्र येऊन किमान तीन शोधनिबंध लिहिले आहेत. आचार्य यांनी रघुराम राजन यांच्या कामाची नेहमीच प्रशंसाही केली आहे. त्यांनी एकदा म्हटले होते की, रघु माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. (वृत्तसंस्था)